Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शबाची राणी शलमोनाला भेटायला येते
( १ राजे 10:1-13 )

1 शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून कूटप्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.

2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती.

3 शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर,

4 त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख; त्याचे प्यालेबरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जाण्याचा त्याचा तो जिना, हे सगळे पाहून ती गांगरून गेली.

5 ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे;

6 तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टीचा मला विश्वास येईना; आता पाहावे तर आपल्या ज्ञानाची अर्धीही थोरवी माझ्या कानी आली नव्हती. आपली कीर्ती मी ऐकली आहे तिच्याहून आपली कीर्ती अधिक आहे.

7 धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक; त्यांना आपणासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो.

8 धन्य आपला देव परमेश्वर; त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापन केले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”

9 तिने राजाला एकशे वीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यांच्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.

10 हूरामाचे कामदार व शलमोनाचे कामदार ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही आणीत.

11 राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला चबुतरे केले; त्याप्रमाणेच गाणार्‍यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असल्या वस्तू त्यापूर्वी यहूदा देशात पाहण्यात आल्या नव्हत्या.

12 शबाच्या राणीने जे जे मागितले ते ते सगळे शलमोन राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे दिले; शिवाय तिने जो नजराणा आणला होता त्याच्याइतक्या मोलाची देणगी तिला दिली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.


शलमोनाची संपत्ती व कीर्ती
( १ राजे 10:14-29 ; २ इति. 1:14-17 )

13 प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे;

14 ह्याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणीत; आणि अरबस्तानचे सर्व राजे व देशाचे सुभेदार शलमोनाकडे सोने, चांदी आणीत.

15 शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले.

16 त्याप्रमाणेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीनशे शेकेल सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोनगृहात ठेवल्या.

17 राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनवले, व ते शुद्ध सोन्याने मढवले.

18 सिंहासनास सहा पायर्‍या आणि सोन्याचे पादपीठ लावले; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले.

19 त्या सहा पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना एकेक सिंह असे एकंदर बारा सिंह केले; दुसर्‍या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते.

20 शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोनी वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नसे.

21 हूरामाच्या कामदारांबरोबर राजाची जहाजे तार्शीशास जात असत; तीनतीन वर्षांनी ही तार्शीशास जाणारी जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणीत असत.

22 शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतींत पृथ्वीवरील सर्व राजांहून श्रेष्ठ होता.

23 देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे राजे त्याच्या दर्शनास येत.

24 प्रत्येक मनुष्य चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्षे आणत असे.

25 शलमोनाचे घोडे व रथ ह्यांची चार हजार ठाणी होती; त्याच्याजवळ बारा हजार राऊत होते; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरांत व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.

26 फरात नदीपासून पलिष्ट्यांचा देश व मिसर देशाची सरहद्द येथवरच्या सर्व राजांवर त्याचे प्रभुत्व असे.

27 राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्याप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबरांच्या झाडांप्रमाणे विपुल केले.

28 लोक मिसराहून व इतर सर्व देशांहून शलमोनासाठी घोडे आणत.


शलमोनाचा मृत्यू
( १ राजे 11:41-43 )

29 शलमोनाची अथपासून इतिपर्यंत एकंदर सर्व कृत्ये नाथान संदेष्ट्याच्या ग्रंथात, शिलोनिवासी अहीया ह्याच्या संदेशलेखांत आणि नबाटपुत्र यराबाम ह्याच्याविषयीच्या इद्दो द्रष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेली नाहीत काय?

30 शलमोनाने यरुशलेमेत अवघ्या इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.

31 शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan