Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शलमोनाची इतर कामगिरी
( १ राजे 9:10-28 )

1 शलमोनाला परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधण्यास वीस वर्षे लागली.

2 त्यानंतर जी नगरे हूराम ह्याने शलमोनाला दिली होती त्यांची त्याने मजबुती केली व तेथे इस्राएल लोकांना वसवले.

3 मग शलमोनाने हमाथ-सोबा नगरावर चाल करून ते हस्तगत केले.

4 त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडारनगरे ह्यांची मजबुती केली.

5 त्याने वरचे बेथ-होरोन व खालचे बेथ-होरोन ह्या दोन्ही तटबंदी नगरांची मजबुती कोट, वेशी व अडसर ह्यांनी केली.

6 बालाथ नगर, शलमोनाची सर्व भांडारनगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे ह्या सर्वांची मजबुती केली; त्याप्रमाणेच यरुशलेमेत, लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शलमोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले.

7 हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्राएल लोकांपैकी नव्हते,

8 त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्‍चात देशात राहून गेले होते व त्यांना इस्राएल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते; अशांवर शलमोनाने वेठबिगार बसवली; आजपर्यंत तसेच चालले आहे.

9 इस्राएल लोकांपैकी कोणासही शलमोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेवले नाही; ते योद्धे, सरदार, सेनापती, रथ व स्वार ह्यांवरचे अधिकारी होते.

10 लोकांवर हुकमत चालवणारे शलमोनाचे नायक अडीचशे होते.

11 मग शलमोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले; तो म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश आला आहे ती ती स्थाने पवित्र होत; म्हणून माझी पत्नी इस्राएलाचा राजा दावीद ह्याच्या मंदिरात राहता कामा नये.”

12 मग शलमोनाने देवडीसमोर बांधलेल्या वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण केले;

13 मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बाथवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण ह्या तीन नेमलेल्या वार्षिक सणांत तो होमबली अर्पण करीत असे.

14 त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.

15 भांडारांसंबंधाने अथवा अन्य कोणत्याही बाबतीत राजाने याजक व लेवी ह्यांना जी आज्ञा दिली होती ती ते अवमानत नसत.

16 परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हापासून ते पुरे होईपर्यंत शलमोनाचे सर्व काम सिद्धीस गेले. अशा प्रकारे परमेश्वराचे मंदिर पुरे झाले.

17 मग शलमोन अदोम देशात समुद्रतीरी एसयोन-गेबेर व एलोथ ह्या नगरांत गेला.

18 हूरामाने त्याच्याकडे आपल्या सेवकांच्या हाती गलबते व दर्यावर्दी लोक पाठवले; त्यांनी शलमोनाच्या कामदारांबरोबर ओफिरास जाऊन चारशे पन्नास किक्कार सोने शलमोनाला आणून दिले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan