Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले. मग आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी व सर्व पात्रे शलमोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.


शलमोन मंदिरात कोश आणतो
( १ राजे 8:1-11 )

2 मग शलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे अर्थात सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व मुख्य, आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे सरदार ह्यांना यरुशलेमेत जमा केले.

3 सर्व इस्राएल पुरुष सातव्या महिन्यातल्या सणात राजाजवळ जमा झाले.

4 इस्राएलाचे सर्व वडील जन आले तेव्हा लेव्यांनी कोश उचलून घेतला.

5 कोश, दर्शनमंडप व मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही लेवीय याजकांनी वरती वाहून नेली.

6 शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे इतके बली अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा मोजता आली नाही.

7 मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश त्याच्या स्थानी म्हणजे मंदिराच्या गाभार्‍यात परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या नेमलेल्या ठिकाणी नेऊन ठेवला.

8 कोशस्थानाच्या वर करूबाचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांवर त्यांचे आच्छादन होते.

9 त्यांचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके कोशातून बाहेर आलेली गाभार्‍यासमोर दिसत, पण बाहेरून दिसत नसत; तो कोश आजपर्यंत तेथेच आहे.

10 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन पाट्या ठेवल्या होत्या; त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते.

11 याजक पवित्रस्थानातून बाहेर आले; जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणांस पवित्र केले होते; त्यांनी ह्या वेळी पाळ्यांचा क्रम सोडला होता.

12 जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात आसाफ, हेमान व यदूथून, तितके सगळे आपल्या पुत्रांसह व भाऊबंदांसह सणाची वस्त्रे लेऊन झांजा, सारंग्या व वीणा घेऊन वेदीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्यांच्याबरोबर एकशे वीस याजक कर्णे वाजवत होते.

13 कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.

14 त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan