Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यहोआहाजाची कारकीर्द व पदच्युती
( २ राजे 23:31-35 )

1 मग देशातल्या लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला त्याच्या जागी यरुशलेमेत राजा केले.

2 यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले.

3 मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.

4 मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला.


यहोयाकीमाची कारकीर्द
( २ राजे 23:36—24:7 )

5 यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

6 त्याच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायांत बेड्या ठोकल्या.

7 नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेवली.

8 यहोयाकीमाची बाकीची कृत्ये, त्याने केलेली अमंगळ कृत्ये, त्याच्या ठायी आढळून आलेले दुष्कर्म ही सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत; त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन1 हा राजा झाला.


यहोयाखीनास कैद करून बाबेलास नेण्यात येते
( २ राजे 24:8-17 )

9 यहोयाखीन आठ2 वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत तीन महिने व दहा दिवस राज्य केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.

10 वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.


सिद्कीयाची कारकीर्द
( २ राजे 24:18-20 ; यिर्म. 52:1-3 )

11 सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले.

12 त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले; यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्याला आदेश देत असताही तो त्याच्यासमोर नम्र झाला नाही.

13 नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.

14 त्याप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले, आणि जे मंदिर परमेश्वराने यरुशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले.

15 त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांना आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती;

16 पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


यहूदाचा बंदीवास
( २ राजे 25:8-21 ; यिर्म. 39:8-10 ; 52:12-30 )

17 त्याने त्यांच्यावर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांना त्यांच्याच पवित्रस्थानाच्या घरात तलवारीने वधले; त्याने तरुणांवर व कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांना त्याच्या हाती दिले.

18 देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.

19 खास्दी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथील वाडे आग लावून जाळले व त्यांतल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.

20 जे तलवारीच्या तडाख्यातून वाचले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले;

21 परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा3 काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले; देश ओस पडला होता तोवर म्हणजे सत्तर वर्षे पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती.


कोरेशाचे फर्मान
( एज्रा 1:1-4 )

22 यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की,

23 “पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध. तर तुमच्यापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो. त्याने तेथे जावे.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan