Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


योशीया वल्हांडण सण पाळतो
( २ राजे 23:21-23 )

1 योशीयाने परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला; पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशू मारला.

2 त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले.

3 जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा.

4 इस्राएलाचा राजा दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्या दोघांनी लिहून ठेवलेल्या विधींना अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा.

5 जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागांप्रमाणे पवित्रस्थानी तुम्ही उभे राहा, म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रीत्यर्थ लेव्यांच्या पितृकुळातील एकेका भागाने सेवा करावी.

6 वल्हांडणाचा यज्ञपशू मारा, आपणांस पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागण्यास आपल्या बांधवांना सिद्ध करा.”

7 जे लोक तेथे हजर होते त्या सर्वांना योशीयाने वल्हांडणाच्या यज्ञासाठी राजाच्या मालमत्तेतून तीस हजार शेरडेमेढरे व तीन हजार बैल दिले.

8 सरदारांनी लोकांना, याजकांना व लेव्यांना स्वेच्छार्पणे दिली. देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्कीया, जखर्‍या व यहीएल ह्यांनी वल्हांडणाच्या यज्ञांसाठी याजकांना दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे व तीनशे बैल दिले.

9 कोनन्या व त्याचे बंधू शमाया व नथनेल, हशब्या, यइएल व योजाबाद ह्या लेव्यांच्या प्रमुखांनी लेव्यांना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाच्या यज्ञांसाठी दिले.

10 ह्या प्रकारे उपासनेची सिद्धता होऊन राजाज्ञेप्रमाणे याजक आपापल्या स्थानी आणि लेवी आपापल्या क्रमानुसार उभे राहिले.

11 मग वल्हांडणाचे यज्ञपशू वधले; बली देणार्‍याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपडत होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढत होते.

12 मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराला अर्पण करण्यास लोकांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे देता यावी म्हणून ही होमार्पणे त्यांनी निराळी ठेवली. बैलांचेही त्यांनी तसेच केले.

13 त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचे मांस विधीप्रमाणे भाजले आणि पवित्र अर्पणे त्यांनी पातेल्यांत, हंड्यांत व कढयांत शिजवून लोकांना लागलीच पोचती केली.

14 नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली.

15 दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदूथून ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते, आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते; त्यांना आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली.

16 ह्या प्रकारे त्याच दिवशी योशीया राजाच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या सर्व उपासनेची तयारी झाली आणि वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्याची सिद्धता झाली.

17 त्या प्रसंगी जे इस्राएल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि सात दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला.

18 शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून ह्या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्राएलात केव्हाही पाळण्यात आला नव्हता; योशीया, याजक, लेवी, हजर असलेले सर्व यहूदी व इस्राएल लोक व यरुशलेमनिवासी ह्यांच्याप्रमाणे पूर्वी कोणत्याही इस्राएलाच्या राजाने अशा प्रकारे वल्हांडण सण पाळला नव्हता.

19 योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला.


योशीयाचा मृत्यू
( २ राजे 23:28-30 )

20 त्यानंतर योशीयाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमीश नगरावर स्वारी करण्यास निघाला; तेव्हा योशीया त्याच्याशी सामना करण्यास गेला.

21 पण त्याने त्याच्याकडे आपले वकील पाठवून सांगितले की, “यहूदाच्या राजा, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? आज मी तुझ्यावर नव्हे तर ज्या घराण्याशी माझे वैर आहे त्यावर स्वारी करण्यास निघालो आहे; देवाने मला त्वरा करण्यास सांगितले आहे, तर माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नकोस; त्याने तुझा नाश करावा असे न होवो.”

22 तथापि योशीया त्याच्याकडून आपला मोर्चा न फिरवता त्याच्याशी लढण्यास वेशांतर करून गेला; देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानता तो मगिद्दोच्या खोर्‍यात युद्ध करण्यास आला.

23 तिरंदाजांनी योशीया राजाला बाण मारले तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला येथून घेऊन चला.”

24 तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला रथावरून उतरवून त्याच्या दुसर्‍या रथावर बसवले व यरुशलेमेस नेले; तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; तेव्हा सर्व यहूदा व यरुशलेम ह्यांनी योशीयासाठी शोक केला.

25 यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.

26 योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने केलेली सत्कृत्ये,

27 म्हणजे अथपासून इतिपर्यंत त्याची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan