२ इतिहास 33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मनश्शेची कारकीर्द ( २ राजे 21:1-18 ) 1 मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले. 2 इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले. 3 त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने काढून टाकली होती ती त्याने पुन्हा बांधली; बआल मूर्तींसाठी वेद्या बांधून त्याने अशेरा मूर्ती केल्या; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे. 4 परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत माझे नाम चिरकाल राहील” त्यात त्याने वेद्या बांधल्या. 5 परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या. 6 त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला. 7 आपण केलेली कोरीव मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यांत मी आपले नाम निरंतर ठेवीन; 8 मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र विदित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही.” 9 मनश्शेने यहूद्यांना व यरुशलेमकरांना एवढे बहकवले की परमेश्वराने इस्राएलांपुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनही अधिक दुराचार त्यांनी केला. 10 परमेश्वराने मनश्शे व त्याचे लोक ह्यांची कानउघाडणी केली, पण त्यांनी पर्वा केली नाही. 11 ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले. 12 तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. 13 त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्याला पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्याला दिले. तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनश्शेला कळून आले. 14 ह्यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गीहोनाच्या पश्चिमेस खोर्यात मत्सवेशीपर्यंत एक कोट बांधला, ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांत त्याने सेनानायक ठेवले. 15 मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या. 16 त्याने परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्धार केला व तिच्यावर शांत्यर्पणे व उपकारस्मरणाचे बली अर्पण केले आणि इस्राएलांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करण्याची यहूदास आज्ञा केली. 17 तरी इस्राएल लोक अजूनही उच्च स्थानी यज्ञ करीतच असत; मात्र ते आपला देव परमेश्वर ह्यालाच ते करीत. 18 मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने आपल्या देवास केलेली प्रार्थना आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाने त्याच्याशी जे द्रष्टे बोलले त्यांची वचने ही सर्व इस्राएलाच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत. 19 त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठेकोठे बांधली ते आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या1 बखरीत लिहिले आहे. 20 मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, त्यांनी त्याला त्याच्याच घरात मूठमाती दिली; त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राजा झाला. आमोनाची कारकीर्द ( २ राजे 21:19-26 ) 21 आमोन राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत दोन वर्षे राज्य केले. 22 त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; त्याचा बाप मनश्शे ह्याने केलेल्या सर्व कोरीव मूर्तींपुढे आमोनाने यज्ञ करून त्यांची उपासना केली. 23 त्याचा बाप मनश्शे परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला. 24 त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याला त्याच्याच वाड्यात जिवे मारले. 25 पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशाच्या लोकांनी जिवे मारले. त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India