२ इतिहास 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)शलमोन परमेश्वराचे निवासस्थान बांधतो ( १ राजे 6:1-38 ) 1 मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शलमोनाचा बाप दावीद ह्याला दर्शन दिले होते त्या अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात दाविदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलमोनाने सुरू केले. 2 त्याने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या द्वितीयेस कामास आरंभ केला. 3 शलमोनाने देवाचे जे मंदिर बांधले त्याच्या पायाचे माप येणेप्रमाणे; त्याची लांबी जुन्या मापाने साठ हात व रुंदी वीस हात. 4 मंदिरापुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती, त्याची उंची एकशे वीस हात होती; शलमोनाने त्याची आतील बाजू शुद्ध सोन्याने मढवली. 5 मंदिराच्या मोठ्या भागाच्या छतास त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी केली; ती त्याने शुद्ध सोन्याने मढवली; तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्या ह्यांची नक्षी काढली. 6 त्याने ते मंदिर मोलवान रत्नांनी सुशोभित केले; सोने वापरले ते पर्वाइम येथले होते. 7 त्याने ते मंदिर, त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती व कवाडे ही सोन्याने मढवली व भिंतींवर करूब खोदवले. 8 मग त्याने मंदिराचे परमपवित्रस्थान तयार केले; त्याची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती; त्याची रुंदी वीस हात होती; त्याने ते सहाशे किक्कार1 शुद्ध सोन्याने मढवले. 9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढवल्या. 10 मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात दोन करूब कोरून तयार केले व ते सोन्याने मढवले. 11 करूबांचे पंख एकंदर वीस हात लांब होते; प्रत्येक करूबाचा एक पंख पाच हात लांब असून तो मंदिराच्या भिंतीला लागला होता, त्याचा दुसरा पंख पाच हात लांब असून तो दुसर्या करूबाच्या पंखाला लागला होता. 12 दुसर्या करूबाचाही एक पंख पाच हात लांब असून मंदिराच्या दुसर्या भिंतीला लागला होता, आणि दुसरा पंखही पाच हात लांब असून पहिल्या करूबाच्या पंखाला जडला होता. 13 त्या करूबांचे पंख वीस हात पसरले होते; ते पायांवर उभे असून त्यांची मुखे आतल्या बाजूकडे होती. 14 मग त्याने निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सणाच्या कापडाचा अंतरपट केला व त्यावर करूब काढले. मंदिरातील हूरामाची कामगिरी ( १ राजे 7:15-51 ) 15 मंदिरासमोर प्रत्येकी पस्तीस हात उंच असे दोन खांब त्याने केले; प्रत्येकाच्या शिरावरचा कळस पाच-पाच हात होता. 16 मग त्याने गाभार्यासाठी साखळ्या करून खांबाला लावल्या, व शंभर डाळिंबे करून साखळ्यांवर लटकवली. 17 हे खांब त्याने मंदिरासमोर, एक उजव्या बाजूस व दुसरा डाव्या बाजूस असे उभे केले; उजव्या बाजूच्या खांबाचे नाव याखीम (तो स्थापील) व डाव्या बाजूच्या खांबाचे नाव बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे होते. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India