२ इतिहास 27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)योथामाची कारकीर्द ( २ राजे 15:32-38 ) 1 योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या. 2 परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला; मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही. प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले. 3 त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले. 4 त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले. 5 त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्यांच्यावर वर्चस्व मिळवले त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू, दहा हजार कोर जव अशी खंडणी दिली. दुसर्या व तिसर्या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली. 6 योथाम आपला देव परमेश्वर ह्याला स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला. 7 योथामाची अवशिष्ट कृत्ये, त्याच्या सर्व लढाया व त्याचे वर्तन हे सर्व इस्राएल व यहूदी ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे. 8 तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता व यरुशलेमेत त्याने सोळा वर्षे राज्य केले. 9 योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा राजा झाला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India