Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अमस्याची कारकीर्द
( २ राजे 14:1-22 )

1 अमस्या राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमेची होती.

2 परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खर्‍या अंत:करणाने केले नाही.

3 त्याच्या हाती राज्य कायम झाले तेव्हा ज्या त्याच्या सेवकांनी त्याचा बाप राजा ह्याला वधले होते त्यांना त्याने जिवे मारले;

4 पण त्याच्या मुलाबाळांना त्याने मारले नाही. “मुलांमुळे बापांना मारू नये व बापांमुळे मुलांना मारू नये, ज्याने पाप केले तोच आपल्या पापास्तव मरावा” अशी जी परमेश्वराची आज्ञा मोशेच्या नियमशास्त्रात लिहिली आहे तिच्याप्रमाणे त्याने केले.

5 अमस्याने अवघा यहूदा व बन्यामीन मिळवला व त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमून दिले; जे वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे होते त्यांची त्याने गणती केली तेव्हा युद्ध करण्याजोगे व भाला व ढाल धारण करण्याजोगे तीन लाख लोक भरले.

6 त्याप्रमाणेच त्याने शंभर किक्कार चांदी देऊन एक लाख इस्राएल योद्धे चाकरीस ठेवले.

7 पण देवाचा एक माणूस त्याच्याकडे येऊन म्हणाला, “हे राजा, इस्राएलाच्या सेनेने तुझ्याबरोबर जाऊ नये, कारण परमेश्वर इस्राएलाच्या म्हणजे सर्व एफ्राईम वंशजांच्या बरोबर नाही.

8 पण तू जाणारच तर मर्दुमकी कर; युद्ध करण्याची हिंमत बांध. देव तुला आपल्या शत्रूपुढे चीत करील; साहाय्य करण्याचे व चीत करण्याचे देवाला सामर्थ्य आहे.”

9 अमस्याने देवाच्या माणसाला विचारले, “मी शंभर किक्कार रुपे इस्राएलच्या सैन्यास देऊन चुकलो आहे त्याच्यासंबंधाने मी काय करू?” देवाच्या माणसाने उत्तर दिले, “तुला ह्याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे.”

10 मग एफ्राइमाहून जे सैन्य त्याच्याकडे आले होते त्याने स्वस्थानी परत जावे म्हणून अमस्याने ते निराळे केले; तेव्हा यहूदावर त्यांचा राग फार भडकला व ते अत्यंत क्रोधायमान होऊन स्वस्थानी परत गेले.

11 अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांना युद्धास नेले; क्षारखोर्‍यात जाऊन सेईर वंशजांपैकी दहा हजार लोक त्याने वधले.

12 यहूदी लोकांनी आणखी दहा हजार पाडाव केले व त्यांना पर्वतशिखरावर नेऊन त्यांचा कडेलोट केला; आणि त्यांचा चुराडा झाला;

13 पण जे सैन्य लढाईस आपल्याबरोबर न नेता अमस्याने परत लावून दिले होते त्या सैन्याने शोमरोनापासून बेथ-होरोनापर्यंत यहूदाच्या नगरांवर हल्ला केला; त्यांनी त्यांतल्या तीन हजारांना ठार करून पुष्कळ लूट नेली.

14 अदोम्यांचा संहार करून परत आल्यावर अमस्याने सेईर लोकांची दैवते आणून त्यांना आपले देव मानले आणि तो त्यांची उपासना करू लागला व त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.

15 तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याच्याकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “ज्या मूर्तींना आपल्या लोकांस तुझ्या हातातून सोडवता आले नाही त्यांच्या भजनी तू का लागलास?”

16 तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”

17 मग यहूदाचा राजा अमस्या ह्याने मसलत घेऊन इस्राएलाचा राजा योवाश1 बिन यहोआहाज बिन येहू ह्याच्याकडे निरोप पाठवला की, “चल, आपण एकमेकांसमोर उभे राहू.”

18 इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या ह्याला सांगून पाठवले की, “लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्या एका गंधसरूकडे मागणी केली की, ‘तुझी मुलगी माझ्या मुलास दे.’ लबानोनात असलेला एक वनपशू त्या वाटेने गेला, त्याने ते काटेझुडूप पायांखाली तुडवून टाकले.

19 तू म्हणतोस, ‘मी अदोमाचा मोड केला,’ त्यामुळे तुझे हृदय उन्मत्त होऊन तू फुशारकी मारत आहेस; आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तू आपण होऊन अरिष्टास का आमंत्रण करत आहेस?”

20 अमस्या काही केल्या ऐकेना; कारण ते अदोमाच्या दैवतांच्या नादी लागले होते म्हणून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या स्वाधीन करावे असा देवाचा संकेत झाला होता.

21 तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.

22 इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्‍याकडे पळ काढला.

23 इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश बिन यहोआहाज ह्याला बेथ-शेमेश येथे पकडून यरुशलेमेस नेले; आणि त्याने एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला.

24 सर्व सोने, रुपे व सर्व पात्रे जी त्याला देवाच्या मंदिरात ओबेद-अदोम ह्याच्याजवळ सापडली ती सगळी व राजमंदिरातील खजिना व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला.

25 इस्राएलाचा राजा योवाश बिन यहोआहाज ह्याच्या मृत्यूनंतर यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश पंधरा वर्षे जगला.

26 अमस्याची अथपासून इतिपर्यंत बाकीची कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केलेली आहेत, नाहीत काय?

27 अमस्याने परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दिले तेव्हा यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले.

28 त्यांनी त्याला घोड्यावर घालून आणले आणि यहूदाच्या राजधानीत त्याच्या पूर्वजांमध्ये त्याला मूठमाती दिली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan