Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सातव्या वर्षी यहोयादाने आपली मजबुती करून शतपती अजर्‍या बिन यहोराम, इश्माएल बिन यहोहानान, अजर्‍या बिन ओबेद, मासेया बिन अदाया आणि अलीशाफाट बिन जिक्री ह्यांच्याशी करार करून त्यांना आपल्या पक्षाचे केले.

2 त्यांनी यहूदात फिरून त्यातील सर्व नगरांतून लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांना एकत्र केले आणि ते यरुशलेमेस आले.

3 सर्व मंडळीने देवाच्या मंदिरात राजाशी करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “दाविदाच्या वंशजांविषयी परमेश्वराने सांगितले आहे त्याप्रमाणे राजपुत्राने गादीवर बसावे.

4 तुम्हांला करायचे ते हेच की तुमच्यातल्या याजकांपैकी व लेव्यांपैकी एकतृतीयांश लोक शब्बाथ दिवशी येत असतात, त्यांनी द्वारपालांचे काम करावे;

5 एक तृतीयांश लोकांनी राजमंदिरावर पहारा करावा आणि एक तृतीयांश लोकांनी तळाच्या वेशीजवळ असावे आणि बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात राहावे.

6 याजक व सेवा करणारे लेवी ह्यांच्याखेरीज कोणी देवाच्या मंदिरात येऊ नये; त्यांनीच मात्र आत यावे, कारण ते पवित्र होत; बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराचा पहारा करावा.

7 लेव्यांपैकी प्रत्येक मनुष्याने आपापल्या हाती शस्त्रे घेऊन राजासभोवती उभे राहावे; कोणी मंदिराच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर येईल-जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.”

8 यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेव्यांनी व सर्व यहूद्यांनी केले; त्यांतल्या प्रत्येकाने शब्बाथ दिवशी आत येण्याची ज्यांची पाळी असे व कामावरून परत जाण्याची ज्यांची पाळी असे त्यांची व्यवस्था केली; यहोयादा याजकाने कोणत्याही पाळीपाळीने येणार्‍या लेव्यांना निरोप दिला नव्हता.

9 दावीद राजाचे भाले, बरच्या व ढाली जी देवाच्या मंदिरात होती ती यहोयादा याजकाने घेऊन शतपतींना दिली.

10 त्याने प्रत्येक मनुष्याला आपापल्या हाती हत्यार घेऊन मंदिराच्या वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजासभोवती उजव्या व डाव्या बाजूस उभे राहायला सांगितले.

11 मग त्याने राजकुमारास बाहेर आणून त्याच्या शिरी मुकुट ठेवला आणि त्याला आज्ञापट देऊन राजा केले; यहोयादा व त्याचे पुत्र ह्यांनी त्याला अभिषेक केला; तेव्हा सर्व लोक म्हणाले, “राजा चिरायू होवो.”

12 लोक धावतपळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत, ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली;

13 आणि पाहते तर राजा प्रवेशस्थानी आपल्या नेहमीच्या स्तंभाजवळ उभा आहे, सेनानायक व कर्णे वाजवणारे राजाजवळ आहेत; देशाचे सर्व लोक कर्णे वाजवून आनंद करीत आहेत; गाणारे व स्तवन शिकवणारे वाद्ये वाजवत आहेत; हे अथल्येच्या दृष्टीस पडले, तेव्हा ती आपली वस्त्रे फाडून, “फितुरी रे फितुरी!” असे म्हणाली.

14 मग यहोयादा याजकाने सेनेवरील शतपतींना बाहेर आणून आज्ञा केली की, “तिला सैन्याच्या रांगेतून बाहेर काढा; तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा;” कारण परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये असे याजकाने सांगितले.

15 तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली; राजमंदिरी जाण्याच्या घोडेवेशीने ती निघून गेली; तेथे त्यांनी तिला जिवे मारले.

16 ह्यानंतर यहोयादा, राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला.

17 तेव्हा सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून त्याच्या वेद्या व मूर्ती ह्यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान ह्याचा वेद्यांसमोर वध केला.

18 मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे व दाविदाने नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पून आनंदाने गायन करावे म्हणून दाविदाने लेवीय याजकांची परमेश्वराच्या मंदिरात वाटणी करून दिली होती, त्यांच्या हाती यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराचे अधिकार सोपवले.

19 कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले.

20 शतपती, अमीरउमराव, लोकांचे सुभे व देशाचे सर्व लोक ह्यांना त्याने बरोबर घेऊन परमेश्वराच्या मंदिरातून राजाला बाहेर आणले; ते वरच्या वेशीतून निघून राजमंदिरात आले आणि राजा राजासनावर बसला.

21 ह्या प्रकारे देशाचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली; अथल्येचा त्यांनी तलवारीने वध केला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan