Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


आसाची कारकीर्द
( १ राजे 15:9-12 )

1 अबीया हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यांनी त्याला दावीदपुरात पुरले आणि त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत देशात दहा वर्षे स्वास्थ्य होते.

2 आसाने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले;

3 त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले व अशेरा मूर्ती भंग केल्या;

4 यहूदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा ह्यांचे पालन करावे अशी त्याने त्यांना आज्ञा केली.

5 त्याने यहूदाच्या सर्व नगरांतून उच्च स्थाने व सूर्याच्या मूर्ती काढून टाकल्या आणि त्याच्या काळात राज्यात स्वस्थता होती.

6 त्याने यहूदात तटबंदीची नगरे बांधली. देशात स्वास्थ्य होते आणि त्या वर्षांत काही लढाई झाली नाही, कारण परमेश्वराने त्याला आराम दिला होता.

7 तो यहूदी लोकांना म्हणाला, “चला, आपण ही नगरे वसवू आणि त्यांना सभोवार कोट, बुरूज, वेशी आणि अडसर करू; देश आपल्या हाती आहे, कारण आपण आपला देव परमेश्वर ह्याची कास धरली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” ह्याप्रमाणे लोक नगरे वसवून समृद्ध झाले.

8 आसाच्या पदरी ढाली व भाले धारण करणार्‍यांची एक सेना होती. यहूदातले तीन लक्ष पुरुष होते; बन्यामिनातले ढाली धारण करणारे व तिरंदाज दोन लक्ष ऐंशी हजार पुरुष होते; हे सर्व शूर योद्धे होते.

9 नंतर दहा लक्ष पुरुषांची सेना व तीनशे रथ घेऊन जेरह नावाचा एक कूशी त्यांच्यावर चाल करून आला; तो मारेशापर्यंत आला.

10 आसा त्याच्याशी सामना करण्यास गेला तेव्हा मारेशा येथे सफाथा नावाच्या खोर्‍यात लढाईस तोंड लागले.

11 ह्या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुझ्यावाचून अन्य कोणी नाही; हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून ह्या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस.”

12 तेव्हा परमेश्वराने आसा व यहूदी ह्यांच्यापुढे कूशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले.

13 आसा व त्याच्याबरोबरचे लोक ह्यांनी त्यांचा पाठलाग गरारापर्यंत केला; त्या प्रसंगी इतके कूशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही; त्याच्या सेनेपुढे त्यांची गाळण उडाली व यहूदी लोकांनी पुष्कळ लूट नेली.

14 त्यांनी गराराच्या आसपासच्या त्या सर्व नगरांना मार दिला; कारण परमेश्वराची दहशत त्या सर्व नगरांना बसली होती; त्यांनी ती नगरे लुटली, कारण त्यात पुष्कळ धन होते.

15 मग त्यांनी गुराढोरांची वाडगी मोडून पुष्कळ शेरडेमेंढरे व उंट लुटून नेले, आणि ते यरुशलेमेस परत गेले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan