Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अबीयाची कारकीर्द
( १ राजे 15:1-8 )

1 यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदावर राज्य करू लागला.

2 त्याने यरुशलेमेत तीन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मीखाया; ही गिबा येथील उरीएल ह्याची कन्या. अबीया व यराबाम ह्यांची लढाई झाली.

3 अबीया मोठमोठ्या लढवय्यांचे चार लक्ष सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला; इकडे यराबाम मोठे शूर वीर असे निवडक आठ लक्ष पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करायला व्यूह रचून सिद्ध झाला.

4 अबीया एफ्राइमाच्या डोंगरवटीतल्या समाराईम पहाडावर उभा राहून बोलला, “हे यराबामा, अहो सर्व इस्राएलांनो, माझे ऐका;

5 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दाविदाला व त्याच्या वंशजांना इस्राएलाचे राज्य मिठाचा करार करून सर्वकाळचे दिले आहे, हे तुम्हांला कळू नये काय?

6 दावीदपुत्र शलमोन ह्याचा सेवक नबाटपुत्र यराबाम ह्याने आपल्या स्वामींवर उठून बंड केले आहे.

7 त्याच्याजवळ हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्याच्याशी सामना करण्यास समर्थ नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यास कंबर कसली आहे.

8 आता दाविदवंशजांच्या हाती असलेले परमेश्वराचे जे राज्य त्याच्याशी तुम्ही विरोध करण्याचा विचार मांडला आहे; तुम्ही एकत्र होऊन तुमचा एक मोठा समुदाय झाला आहे आणि यराबामाने जी सोन्याची वासरे तुमचे देव व्हावेत म्हणून बनवली ती तुमच्याजवळ आहेत.

9 तुम्ही परमेश्वराचे याजक जे अहरोनाचे वंशज आणि लेवी त्यांना घालवून देऊन इतर राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे आपले याजक केले आहेत, हे खरे ना? एखाद्याने गोर्‍हा व सात एडके आणून स्वतःस संस्कार केला की जे देव नव्हेत त्यांचा तो याजक बनतो.

10 आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे. आम्ही त्याला सोडले नाही; आणि परमेश्वराची सेवाचाकरी करणारे जे याजक आमच्याजवळ आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत.

11 ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळतात; ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात; सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात; आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले आहे.

12 पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”

13 तरीपण यराबामाने दबा धरणार्‍यांना वळसा घालायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले; ह्या प्रकारे यहूदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते.

14 यहूदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्यापुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक कर्णे वाजवू लागले.

15 यहूदी लोकांनी जयघोष केला; ते जयजयकार करीत असता देवाने अबीया व यहूदा ह्यांच्यासमोर यराबाम व सर्व इस्राएल ह्यांचा मोड केला.

16 इस्राएल लोक यहूदासमोरून पळाले आणि देवाने त्यांना त्यांच्या हाती दिले.

17 अबीया व त्याचे लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली; त्या दिवशी इस्राएलातल्या पाच लक्ष निवडक पुरुषांचा संहार झाला.

18 ह्या प्रकारे इस्राएल लोक त्या प्रसंगी चीत झाले, आणि यहूदी लोक प्रबल झाले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवली होती.

19 अबीयाने यराबामाचा पाठलाग करून बेथेल, यशाना व एफ्रोन ही नगरे त्यांच्या आसपासच्या गावांसहित काबीज केली.

20 अबीयाच्या कारकिर्दीत यराबाम पुन्हा काही सावरला नाही; परमेश्वराने त्याला ताडन केल्यामुळे तो मृत्यू पावला.

21 अबीया प्रबळ झाला; त्याने चौदा बायका केल्या आणि त्याला बावीस पुत्र व सोळा कन्या झाल्या.

22 अबीयाची वरकड कृत्ये, त्याची चालचलणूक व त्याची वचने ही संदेष्टा इद्दो ह्याच्या बखरीच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan