Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ इतिहास 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहूदाचा व बन्यामिनाचा वंश ह्यांतून एकंदर एक लाख ऐंशी हजार निवडक योद्धे जमा केले; इस्राएलाशी लढाई करून रहबामाच्या हाती राज्य परत यावे असा ह्यात हेतू होता.

2 तेव्हा देवाचा माणूस शमाया ह्याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की,

3 “यहूदाचा राजा शलमोनपुत्र रहबाम, यहूदा व बन्यामीन ह्यांच्या कुळातले सर्व इस्राएल लोक ह्यांना असे सांग,

4 ‘परमेश्वर म्हणतो, आपल्या बांधवांवर स्वारी करून लढू नका; तुम्ही सर्व आपापल्या घरी परत जा; कारण ही माझी करणी आहे.”’ त्यांनी परमेश्वराचे हे वचन ऐकले व त्यानुसार यराबामावर चाल करून जायचे सोडून ते सर्व परत गेले. रहबामाचे ऐश्वर्य

5 मग रहबाम यरुशलेमेत राहू लागला आणि यहूदाच्या संरक्षणासाठी त्याने पुढील तटबंदीची नगरे बांधली :

6 बेथलेहेम, एटाम, तकोवा,

7 बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,

8 गथ, मारेशा, सीफ,

9 अदोरईम, लाखीश, अजेका,

10 सोरा, अयालोन व हेब्रोन ही यहूदातील व बन्यामिनातील तटबंदीची नगरे त्याने बांधली.

11 त्याने आणखी दुर्गांची तटबंदी केली व त्यांच्यावर नायक नेमले आणि त्यांत अन्नसामग्री, तेल व द्राक्षारस ह्यांचा साठा केला.

12 मग प्रत्येक नगरात त्याने ढाली व भाले ह्यांचा पुरवठा करून त्यांना अधिक मजबुती आणली. यहूदा व बन्यामीन हे तर त्याचेच होते.

13 अखिल इस्राएलातील याजक व लेवी आपले सर्व प्रदेश सोडून त्याच्याकडे गेले.

14 ह्या प्रकारे सर्व इस्राएलात लेवी आपली शिवारे व वतने सोडून यहूदा व यरुशलेम येथे आले; कारण त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करू नये म्हणून यराबाम व त्याचे पुत्र ह्यांनी त्यांना घालवून दिले होते.

15 यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तींसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तींसाठी आपलेच याजक नेमले.

16 इस्राएलाच्या सर्व वंशांतले जे लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या भजनी मनोभावे लागले होते ते सर्व आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर बली अर्पण करण्यासाठी लेव्यांच्या मागून यरुशलेमेस आले.

17 ह्या प्रकारे त्यांनी यहूदाचे राज्य स्थिर करून शलमोनाचा पुत्र रहबाम ह्याला तीन वर्षे बळकट केले; ते तीन वर्षेपर्यंत दावीद व शलमोन ह्यांच्या मार्गाने चालले.

18 रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;

19 तिच्या पोटी त्याला यऊश, शमर्‍या व जाहम हे पुत्र झाले.

20 तिच्यामागून त्याने अबशालोमाची कन्या माका बायको केली; तिच्या पोटी त्याला अबीया, अत्थय, जीजा व शलोमीथ ही मुले झाली.

21 रहबाम आपल्या सर्व पत्नी व उपपत्नी ह्यांच्यापेक्षा अबशालोमाची कन्या माका हिच्यावर अधिक प्रीती करीत असे; त्याने अठरा पत्नी व सात उपपत्नी केल्या व त्याला अठ्ठावीस पुत्र व साठ कन्या झाल्या.

22 रहबामाने माकाचा पुत्र अबीया ह्याला त्याच्या सर्व बंधूंमध्ये मुख्य सरदार नेमले; त्याला राजा करावे असा त्याचा मानस होता.

23 तो मोठ्या चतुराईने वागला; त्याने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा व बन्यामीन ह्यांच्या सर्व प्रदेशातील प्रत्येक तटबंदी नगरात निरनिराळे ठेवले व त्यांना खाण्यापिण्याची विपुल सामग्री पुरवली व पुष्कळ बायका करून दिल्या.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan