२ इतिहास 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)विवेकबुद्धीसाठी शलमोनाची प्रार्थना ( १ राजे 3:3-15 ) 1 दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले. 2 शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून 3 शलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने रानात बनवलेला देवाचा दर्शनमंडप तेथेच होता. 4 दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता. 5 बसालेल बिन ऊरी बिन हूर ह्याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवासमंडपापुढे असे; शलमोन मंडळीसह तिकडे गेला. 6 दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलमोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होमबली अर्पण केले. 7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.” 8 शलमोन देवाला म्हणाला, “माझा पिता दावीद ह्याच्यावर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस. 9 आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद ह्याला दिलेले वचन पूर्ण कर; मातीच्या रजःकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहेस. 10 ह्या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे; तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल?” 11 देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस, 12 त्या अर्थी चातुर्य व ज्ञान हे तर तुला देतोच; ह्यांखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणालाही कधी प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन.” 13 मग शलमोन गिबोन येथल्या उच्च स्थानाच्या दर्शनमंडपासमोरून यरुशलेमेस आला व तेथे इस्राएलावर राज्य करू लागला. घोडे व रथ ह्यांचा शलमोनाने केलेला व्यापार ( १ राजे 10:26-29 ; २ इति. 9:25-28 ) 14 शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्या-जवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. 15 राजाने यरुशलेमेत चांदी व सोने धोंड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले. 16 शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्यांची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत. 17 एकेका रथास सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्यास दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत; तसेच ते व्यापारी हित्ती व अरामी राजांसाठीही आणीत. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India