Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

1 तीमथ्य 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


खोटे शिक्षण देणार्‍यांविषयी

1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;

2 ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;

3 लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील.

4 देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, आणि उपकारस्तुती करून घेतलेले काही वर्ज्य नाही;

5 कारण देवाचे वचन व प्रार्थना ह्यांनी ते शुद्ध होते.

6 ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

7 अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर;

8 कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.

9 हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे.

10 ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.


तीमथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण

11 ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव.

12 कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्‍यांचा कित्ता हो.

13 मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव.

14 तुझ्यावर वडीलवर्ग2 हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.

15 तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा.

16 आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण साधशील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan