Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

1 तीमथ्य 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ख्रिस्ती मंडळीचे कामदार

1 कोणी अध्यक्षाचे3 काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे.

2 अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.

3 तो मद्यपी व मारका नसावा; तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा,

4 आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा;

5 कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील?

6 त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा.

7 त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.

8 तसेच सेवकही4 गंभीर असावेत; दुतोंडे, मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळवणारे नसावेत;

9 विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेकभावाने राखणारे असावेत.

10 त्यांचीही अगोदर पारख व्हावी; आणि निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवकपण करावे.

11 तसेच, स्त्रिया गंभीर असाव्यात, चहाड नसाव्यात, नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.

12 सेवक एका स्त्रीचा पती असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत.

13 कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात.

14 तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे;

15 तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

16 सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan