Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

1 तीमथ्य 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


नमस्कार व खोट्या शिक्षणासंबंधाने इशारा

1 देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,

2 देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो.

3 मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की, तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका.

4 आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणार्‍या, पण वाद मात्र उत्पन्न करणार्‍या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आताही सांगतो.

5 ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.

6 हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत;

7 ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खातरीने सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही.

8 नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे;

9 आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,

10 जारकर्मी, पुंमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे ह्यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे;

11 धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे.


ख्रिस्तकृपेबद्दल पौलाने दाखवलेली कृतज्ञता

12 ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो;

13 कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;

14 आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली.

15 ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.

16 तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.

17 जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.

18 माझ्या मुला तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर;

19 विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले;

20 त्यांच्यात हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत; त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan