Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

1 थेस्सल 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


पवित्र वर्तनाविषयी बोध

1 बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे1 हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात; त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.

2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत.

3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.

4-5 देवाला न ओळखणार्‍या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर2 ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.3

6 कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.

7 कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.

8 म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.

9 बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे ह्याची तुम्हांला गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हांला देवानेच शिकवले आहे;

10 आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी,

11-12 बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे, आणि तुम्हांला कशाचीही गरज पडू नये म्हणून, आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे, आणि आपल्या हातांनी काम करणे, ह्यांची हौस तुम्हांला असावी.


मेलेल्या ख्रिस्तशिष्यांबद्दल समाधान

13 बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.

14 कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.

15 प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही.

16 कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.

17 नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.

18 म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan