Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शौल आणि त्याचे मुलगे ह्यांचा मृत्यू
( १ इति. 10:1-12 )

1 पलिष्टी इस्राएलाशी लढले; तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.

2 पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून, शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब1 व मलकीशुवा ह्यांचा वध केला.

3 शौलाशी निकराची लढाई झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले; त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला.

4 तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.

5 शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.

6 ह्या प्रकारे शौल, त्याचे तिघे पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले.

7 खोर्‍यांच्या पलीकडे आणि यार्देनेच्या पलीकडे जे इस्राएल लोक होते त्यांनी पाहिले की इस्राएल लोक पळाले आहेत आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.

8 दुसर्‍या दिवशी मारलेल्या लोकांना नागवण्यास पलिष्टी आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.

9 तेव्हा त्यांनी शौलाचे शिर छेदले, त्याची हत्यारे लुटली आणि आपल्या देशात सर्वत्र जासूद पाठवून त्यांच्या देवळांत व लोकांत हे वर्तमान पसरवले.

10 त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोथ देवीच्या मंदिरात ठेवली व त्याचे धड बेथ-शानच्या गावकुसावर टांगले.

11 पलिष्ट्यांनी शौलाचे काय केले ते याबेश-गिलादाच्या रहिवाशांनी ऐकले;

12 तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले, आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते बेथ-शानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली.

13 त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan