Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शमुवेलाला परमेश्वराचे पाचारण

1 शमुवेल बाळ एलीसमक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते; त्याचे दृष्टान्त वारंवार होत नसत.

2 त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,)

3 देवाचा दीप अजून मालवला नव्हता, आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता.

4 तेव्हा परमेश्वराने शमुवेलास हाक मारली; तो म्हणाला, “काय आज्ञा?”

5 मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” तो म्हणाला, “मी हाक मारली नाही; परत जाऊन नीज.” त्यावरून तो परत जाऊन निजला.

6 पुन्हा परमेश्वराने “शमुवेला, शमुवेला,” अशी हाक मारली, तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली!” तो म्हणाला, “मुला, मी तुला हाक मारली नाही; परत जाऊन नीज.”

7 अद्यापि शमुवेलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते.

8 परमेश्वराने शमुवेलास तिसर्‍यांदा हाक मारली, तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला.

9 तेव्हा एली शमुवेलास म्हणाला, “जाऊन नीज, आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल जाऊन आपल्या जागी निजला.

10 तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”

11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा, मी इस्राएलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील.

12 एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अथपासून इतिपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन.

13 मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.

14 ह्यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ घेतली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन यज्ञ व अर्पण ह्यांनी कदापि व्हायचे नाही.”

15 मग शमुवेल सकाळपर्यंत निजून राहिला; सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. हा दृष्टान्त एलीला कळवण्याचे शमुवेलाला भय वाटले.

16 एलीने शमुवेलास हाक मारून म्हटले, “मुला, शमुवेला,” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?”

17 एली म्हणाला, “परमेश्वराने तुला जी गोष्ट सांगितली ती कोणती? माझ्यापासून ती लपवू नकोस; तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काहीएक तू लपवून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करो.”

18 शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काही लपवले नाही. मग तो म्हणाला, “परमेश्वरच तो, त्याला जसे बरे वाटेल तसे तो करो.”

19 शमुवेल वाढत गेला; परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.

20 दानापासून बैर-शेबापर्यंत राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना माहीत झाले की, शमुवेल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरला आहे.

21 परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमुवेलाला प्रकट झाला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan