१ शमुवेल 27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दाविदाचे पलिष्ट्यांमध्ये वास्तव्य 1 दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.” 2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे सहाशे लोक निघून गथचा राजा मावोखपुत्र आखीश ह्याच्याकडे गेले. 3 दावीद व त्याचे लोक आपापल्या परिवारांसह गथात आखीशाच्या जवळ राहिले; दावीद आपल्या दोन स्त्रिया म्हणजे इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना घेऊन राहिला. 4 दावीद गथ येथे पळून गेला हे वर्तमान शौलाला समजल्यावर त्याने त्यानंतर त्याचा शोध केला नाही. 5 दावीद आखीशास म्हणाला, “माझ्यावर आपली कृपादृष्टी असेल तर एखाद्या खेडेगावात मला जागा द्या म्हणजे मी तेथे राहीन; आपल्या दासाने आपल्याबरोबर राजधानीत का राहावे?” 6 तेव्हा आखीशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले; म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहूदाच्या राजाचे आहे. 7 पलिष्ट्यांच्या देशात दावीद जाऊन राहिला त्या घटनेस पुरे एक वर्ष चार महिने झाले. 8 मग दावीद व त्याचे लोक ह्यांनी गशूरी, गिरजी व अमालेकी ह्यांच्यावर स्वारी केली; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती. 9 दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि तेथल्या कोणाही स्त्रीपुरुषास जिवंत सोडले नाही, आणि तेथली शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे, उंट आणि वस्त्रप्रावरणे घेऊन तो परत आखीशाकडे गेला. 10 आखिशाने विचारले, “आज तू कोणावर स्वारी केलीस?” दावीद म्हणाला, “यहूदाचा दक्षिण प्रांत, यरहमेल्यांचा दक्षिण प्रांत व केन्यांचा दक्षिण प्रांत ह्यांवर.” 11 दाविदाने गथ येथे आणायला कोणी स्त्री किंवा पुरुष जिवंत ठेवला नाही; तो म्हणाला, “त्यांना आणले असते तर दाविदाने असे असे केले अशी त्यांनी आमची चहाडी केली असती.” तो पलिष्ट्यांच्या देशात राहिला तोपर्यंत त्याचा असाच क्रम चालू राहिला. 12 आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India