१ शमुवेल 23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)कईलात आणि रानात दावीद लपून राहतो 1 दाविदाला बातमी लागली की पलिष्टी लोक कईला नगराशी लढत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत. 2 तेव्हा दाविदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” परमेश्वर त्याला म्हणाला, “जा, पलिष्ट्यांवर मारा करून कईलाचा बचाव कर. 3 दाविदाचे लोक त्याला म्हणाले, “पाहा, येथे यहूदात जर आम्हांला भीती आहे तर पलिष्ट्यांच्या सैन्यावर आम्ही कईलाकडे चालून गेलो तर मग काय विचारावे?” 4 दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.” 5 मग दावीद व त्याचे लोक कईलास गेले; त्यांनी पलिष्ट्यांशी युद्ध करून त्यांची गुरेढोरे हाकून आणली आणि त्यांची मोठी कत्तल केली. ह्या प्रकारे दाविदाने कईला येथील रहिवाशांचे रक्षण केले. 6 अहीमलेखाचा पुत्र अब्याथार हा कईला येथे दाविदाकडे पळून गेला तेव्हा तो हाती एफोद घेऊन गेला होता. 7 दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.” 8 तेव्हा कईलास जाऊन दाविदाला व त्याच्या लोकांना घेरावे म्हणून शौलाने आपल्या सर्व लोकांना युद्धासाठी बोलावले. 9 शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.” 10 मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, शौल माझ्यामुळे कईला नगराचा नाश करण्यासाठी येऊ पाहत आहे, हे वर्तमान तुझ्या दासाने तरी नक्की ऐकले आहे. 11 कईला येथील लोक मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या दासाच्या कानावर आले आहे त्याप्रमाणे शौलाचे येणे होईल काय? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तुझी मी विनवणी करीत आहे. तुझ्या दासाला काय ते सांग.” परमेश्वर म्हणाला, “तो येईल.” 12 दाविदाने विचारले, “कईलाचे लोक मला व माझ्या लोकांना शौलाच्या हाती देतील काय?” परमेश्वर म्हणाला, “होय देतील.” 13 तेव्हा दावीद व त्याचे सुमारे सहाशे लोक कईलातून निघून वाट फुटेल तिकडे गेले. दावीद कईलाहून निसटून गेला हे शौलाला कोणी सांगितले, तेव्हा त्याने निघण्याचे रहित केले. 14 मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही. 15 दाविदाला कळून चुकले होते की शौल आपला प्राण घ्यायला निघाला आहे. दावीद जीफ नावाच्या रानात एका उंचवट्यावरील झाडीत राहिला होता. 16 तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंचवट्यावरील झाडीत गेला व देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली. 17 त्याने त्याला म्हटले, “भिऊ नकोस, माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल ह्यालाही हे ठाऊक आहे.” 18 त्या दोघांनी परमेश्वरापुढे करार केला; मग दावीद त्या उंचवट्यावरील झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला. 19 नंतर जिफी लोक गिबा येथे शौलाकडे येऊन म्हणाले, “रानाच्या दक्षिणेस हकीलाच्या डोंगरात उंचवट्यावरील झाडीतल्या गढ्यांमध्ये आमच्याकडे दावीद लपून राहिला आहे ना? 20 तर आता, महाराज, आपली खाली येण्याची उत्कट इच्छा आहे, तिच्यानुसार खाली या; राजाच्या हाती त्याला देणे हे आमचे काम.” 21 शौल म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो; कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे; 22 तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या; त्याची बसण्याउठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला, ह्याची सगळी माहिती काढा; कारण तो मोठा धूर्त आहे; 23 तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.” 24 मग ते निघून शौलाच्या अगोदर जीफ येथे गेले; पण दावीद व त्याचे लोक रानाच्या दक्षिणेस अराबात मावोनाचे अरण्य आहे तेथील मैदानात होते. 25 शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला. 26 शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची त्वरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दाविदाला व त्याच्या लोकांना पकडण्यासाठी त्यांना घेरू पाहत होते. 27 इतक्यात एका जासुदाने शौलाला येऊन सांगितले, “चला, त्वरा करा, कारण पलिष्ट्यांनी देशावर स्वारी केली आहे. 28 तेव्हा शौल दाविदाचा पाठलाग करण्याचे सोडून पलिष्ट्यांशी सामना करण्यासाठी गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव सेला-हम्मालकोथ (निसटून जाण्याचा खडक) असे पडले. 29 दावीद तेथून निघून एन-गेदीच्या गढ्यांमध्ये राहू लागला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India