Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शौल दाविदाचा वध करू पाहतो

1 शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते.

2 म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा.

3 ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याच्याकडे तुझी गोष्ट काढीन; मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन.”

4 योनाथानाने आपला बाप शौल ह्याच्याकडे दाविदाची प्रशंसा करून म्हटले की, “राजाने आपला दास दावीद ह्याच्याविरुद्ध अपराध करू नये. कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत.

5 कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्‍त सांडण्याचे पाप का करता?”

6 शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले; त्याने आणभाक करून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जिवे मारायचे नाही.”

7 योनाथानाने दाविदाला बोलावून आणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या; मग योनाथानाने दाविदाला शौलाकडे नेले; आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला.

8 इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले.

9 शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरात बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवत असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला.

10 दाविदाला भाल्याने भोसकून त्याला भिंतीशी खिळावे असा शौलाने प्रयत्न केला, पण तो शौलापुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला; तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला.

11 दाविदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारून टाकावे म्हणून शौलाने तिकडे जासूद पाठवले; तेव्हा दाविदाची बायको मीखल हिने त्याला सांगितले, “आज रात्री आपण आपल्या जिवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल.”

12 मग मीखलने खिडकीतून दाविदाला उतरवले, व तो पळून जाऊन निभावला.

13 मीखलने तेराफीम (कुलदेवता) घेऊन ती पलंगावर निजवली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसांची उशी ठेवून ती वस्त्राने झाकली.

14 शौलाने दाविदाला पकडण्यासाठी जासूद पाठवले तेव्हा ती म्हणाली, “तो आजारी आहे.”

15 मग शौलाने दाविदाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूद पाठवून त्याला सांगितले की, “त्याला पलंगासहित घेऊन या; मी त्याला मारून टाकणार.”

16 ते आत येऊन पाहतात तर पलंगावर कुलदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोक्याखाली बकर्‍यांच्या केसांची उशी आहे असे त्यांना दिसून आले.

17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला पळू देऊन त्याला आपला बचाव का करू दिलास?” मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, माझ्या हातून तू का मरतेस?”

18 दावीद पळून निभावून रामास शमुवेलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.

19 दावीद रामातील नायोथ येथे राहत आहे असे वर्तमान कोणी शौलाला सांगितले,

20 तेव्हा शौलाने दाविदाला पकडून आणण्यासाठी जासूद पाठवले. संदेष्ट्यांचे मंडळ भाषण करीत आहे व शमुवेल त्यांच्यापुढे उभा आहे असे शौलाच्या त्या जासुदांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या ठायी संचरला व तेही भाषण करू लागले.

21 शौलास ही बातमी लागली तेव्हा त्याने दुसरे जासूद पाठवले, तेही तसेच भाषण करू लागले. शौलाने तिसर्‍यांदा जासूद पाठवले. तेही भाषण करू लागले.

22 मग तो स्वत: रामास गेला, व सेखूतल्या मोठ्या हौदानजीक येऊन पोहचल्यावर विचारू लागला, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” तेव्हा कोणी सांगितले, “पाहा, ते रामातील नायोथ येथे आहेत.”

23 त्यावरून तो तिकडे रामात नायोथाकडे गेला; तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठायी संचरला व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहचेपर्यंत भाषण करीत चालला.

24 तो आपली वस्त्रे फेडून शमुवेलापुढे भाषण करू लागला, व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला. ह्यावरून ’शौलही संदेष्ट्यांपैकीच आहे काय?’ अशी म्हण पडली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan