Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


योनाथान आणि दावीद ह्यांच्यामधील करार

1 दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.

2 शौलाने त्या दिवशी त्याला ठेवून घेतले; त्याला आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही.

3 मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता.

4 योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरवून दाविदाला दिला; त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व कमरबंदही दिला.

5 जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी; शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले; तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले.


शौलाच्या अंतःकरणात दाविदाविषयी मत्सर

6 त्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्राएलाच्या सर्व नगरांतून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजाला सामोर्‍या आल्या.

7 नृत्य करणार्‍या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत : “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.”

8 हे ऐकून शौलाला फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाहीत; तो म्हणाला, “त्यांनी दाविदाला लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले; राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?”

9 त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला.

10 दुसर्‍या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला, व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला; दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवत होता; आणि शौलाच्या हाती भाला होता.

11 शौलाने त्याला मारायला भाला उगारला; तो म्हणाला की, “भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे;” पण दाविदाने त्याच्यासमोरून एकीकडे सरकून त्याला दोनदा चुकवले.

12 परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलाला सोडले होते, ह्यामुळे दावीद शौलाला भीत असे.

13 मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे.

14 दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.

15 दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करत असतो हे पाहून शौलाला त्याचा धाक वाटू लागला;

16 तरीपण सगळे इस्राएल व यहूदी दाविदावर प्रेम करीत. कारण तो त्यांच्यापुढे चालत असे.

17 शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.

18 दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय? आणि इस्राएलात माझ्या बापाचे कूळ ते काय?”

19 शौलाची कन्या मेरब हिचा ह्या वेळी दाविदाशी विवाह व्हायचा होता तरी तो न होता तिचा विवाह अद्रीएल महोलाथी ह्याच्याशी झाला.

20 शौलाची कन्या मीखल हिचे दाविदावर प्रेम जडले; लोकांनी हे शौलाला कळवले, तेव्हा त्याला ते पसंत पडले.

21 शौल म्हणाला, “ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडेल.” ह्यास्तव शौल दाविदाला म्हणाला, “ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार.”

22 शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की, “दाविदाला आतून असे म्हणा की ’राजा तुझ्यावर प्रसन्न आहे; त्याचे सर्व सेवक तुझ्यावर प्रेम करतात, तर आता तू राजाचा जावई हो.”’

23 शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, “मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे; राजाचा जावई होणे ही तुमच्या दृष्टीने हलकी गोष्ट आहे काय?”

24 शौलाला त्याच्या सेवकांनी सांगितले की दावीद असे म्हणाला.

25 तेव्हा शौल म्हणाला, “तुम्ही दाविदाला जाऊन सांगा की, राजाला हुंडा नको; मात्र राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा हव्या आहेत.” शौलाचा ह्यात असा हेतू होता की अशाने तरी दावीद पलिष्ट्यांच्या हातून पतन पावेल.

26 त्याच्या चाकरांनी दाविदाला हे सांगितले तेव्हा राजाचा जावई होण्याचे त्याला पसंत पडले. लग्नसराईचे दिवस अजून संपले नव्हते;

27 तेव्हा दावीद आपले लोक बरोबर घेऊन गेला व त्याने पलिष्ट्यांचे दोनशे पुरुष मारले; दाविदाने त्यांच्या अग्रत्वचा आणून राजाचा जावई होण्यासाठी त्याला बरोबर मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल हिचे त्याच्याशी लग्न करून दिले.

28 हे पाहून शौलाच्या लक्षात आले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे; आणि त्याची कन्या मीखल हिचे त्याच्यावर प्रेम जडले.

29 तेव्हा दाविदाचा शौलाला अधिकच धाक वाटू लागला, आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला.

30 पलिष्ट्यांचे सरदार युद्धास सिद्ध झाले; जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत तेव्हा तेव्हा दावीद शौलाच्या इतर सेवकांपेक्षा अधिक चतुराईने यश संपादी, ह्यामुळे त्याच्या नावाची ख्याती झाली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan