Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ शमुवेल 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण पलीकडे पलिष्ट्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ.” पण त्याने हे बापाला कळवले नाही.

2 शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता व त्याच्याबरोबर सुमारे सहाशे लोक होते;

3 अहीया बिन अहीटूब (ईखाबोदाचा भाऊ) बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता; तो एफोद धारण करून त्याच्याबरोबर होता. योनाथान गेला हे लोकांना माहीत नव्हते.

4 ज्या घाटांनी योनाथान पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता त्यांच्या एका बाजूला एक व दुसर्‍या बाजूला एक असे दोन सुळके होते; एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेने असे होते.

5 एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे.

6 तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”

7 त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला म्हटले, “आपल्या मनाला येईल ते सगळे करा, तेथे चला; आपल्या मर्जीप्रमाणे मी आपल्याबरोबर आहे.”

8 योनाथान म्हणाला, “पाहा, आपण त्या माणसांजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू.

9 ते जर आपल्याला म्हणाले की, ‘थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो,’ तर आपण जागच्या जागी थांबू, त्यांच्याकडे वर जाणार नाही;

10 पण जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण वर जाऊ; परमेश्वराने त्यांना आपल्या हाती दिले आहे ह्याची हीच खूण आपण समजू.”

11 मग ते दोघे पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांच्या दृष्टीसमोर गेले; तेव्हा पलिष्टी म्हणाले, “पाहा, इब्री लोक बिळात लपून राहिले होते ते आता बाहेर पडत आहेत.”

12 त्या ठाण्यातले लोक योनाथानाला व त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाले, “तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे आम्ही तुम्हांला काही दाखवू.” योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागून वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”

13 योनाथान व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे पलिष्टी लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला.

14 योनाथान व त्याचा शस्त्रवाहक ह्यांनी जी पहिली कत्तल केली तींत एक बिघाभर जमिनीवर सुमारे वीस माणसे पडली.

15 मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला.

16 इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले.

17 तेव्हा शौलाने आपल्याबरोबरच्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पाहा.” त्यांनी मोजणी केली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते.

18 मग शौल अहीयाला म्हणाला, “देवाचा कोश इकडे आण.” देवाचा कोश त्या समयी इस्राएल लोकांबरोबरच होता.

19 शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला, तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “आपला हात आवर.”

20 मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले.

21 तेव्हा जे इब्री पूर्वीपासून पलिष्ट्यांबरोबर होते व जे चोहोकडून त्यांच्या छावणीला येऊन मिळाले होते तेही शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या इस्राएल लोकांना येऊन मिळाले.

22 तसेच जे इस्राएल लोक एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की, पलिष्टी लोक पळत आहेत तेव्हा त्यांनीही त्यांच्याशी लढून त्यांचा जबर पिच्छा पुरवला.

23 ह्या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्राएल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेथ-आवेनापर्यंत गेले.

24 त्या दिवशी इस्राएल लोक अतिशय दुःखी झाले; कारण शौलाने लोकांना शपथ घातली होती की, “मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यायचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नाला स्पर्श करील त्याला शाप लागो;” म्हणून त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नाला शिवला नाही.

25 मग सर्व लोक एका वनात आले; तेथे जमिनीवर मध होता.

26 लोक वनात आले तेव्हा मधाच्या धारा लागलेल्या त्यांनी पाहिल्या. पण कोणीही तो हातात घेऊन तोंडाला लावला नाही, कारण लोकांना शपथेची भीती होती.

27 आपल्या बापाने लोकांना शपथ घालून मनाई केली होती हे योनाथानाला ठाऊक नव्हते; म्हणून त्याने आपल्या हातात असलेल्या काठीचे टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात खुपसले, आणि मध हातात घेऊन तोंडाशी नेला; तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले.

28 एका मनुष्याने त्याला म्हटले, “तुमच्या बापाने लोकांना शपथ घालून बजावून सांगितले आहे की, आज जो कोणी मनुष्य काही अन्न खाईल त्याला शाप लागो.” लोक तर व्याकूळ झाले होते.

29 योनाथान म्हणाला, “माझ्या बापाने देश कष्टी करून सोडला आहे; मी हा मध थोडासा चाखला तोच माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत पाहा;

30 तर शत्रूंकडून मिळालेल्या लुटीतून लोकांनी यथेच्छ खाल्ले असते तर आज कितीतरी बरे झाले असते; कारण पलिष्ट्यांचा संहार फारसा झाला नाही.”

31 त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यांना चोपत गेले, पण ते अगदी व्याकूळ झाले होते;

32 म्हणून ते लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, बैल व वासरे जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.

33 शौलाला कोणी असे सांगितले की, “लोक रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करीत आहेत,” तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे; एक मोठा दगड माझ्याकडे लवकर लोटून आणा.”

34 शौल म्हणाला, “लोकांमध्ये चोहोकडे जाऊन त्यांना सांगा की, आपापले बैल व मेंढरे माझ्याकडे घेऊन या आणि येथेच कापून खा; रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी त्या रात्री आपापले बैल तेथे नेऊन कापले.

35 शौलाने परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांधली; ही पहिलीच वेदी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ बांधली.

36 शौल म्हणाला, “आपण आज रात्री पलिष्ट्यांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यांना लुटू; त्यांतला एक मनुष्यही सोडता कामा नये.” ते म्हणाले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.” त्या वेळी याजकाने म्हटले, “चला, आपण येथे देवासमीप जाऊ.”

37 शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांचा पाठलाग करू काय? तू त्यांना इस्राएलाच्या हाती देशील काय?” पण त्याने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.

38 शौल म्हणाला, “लोकनायकहो, इकडे या; आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे ह्याचा शोध करून पाहा.

39 इस्राएलांस उद्धरणार्‍या परमेश्वराच्या जीविताची शपथ, हे पातक माझा पुत्र योनाथान ह्याच्याकडून झाले असले तर तोही अवश्य मारला जाईल.” पण त्या लोकांपैकी कोणीही बोलेना.

40 मग त्याने इस्राएल लोकांना सांगितले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा पुत्र योनाथान दुसर्‍या बाजूला होऊ.” लोकांनी शौलाला म्हटले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.”

41 शौल इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “खरे काय ते आम्हांला दाखवून दे.” तेव्हा योनाथान व शौल ह्यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि लोक सुटले.

42 शौल म्हणाला, “आता माझी व माझा पुत्र योनाथान ह्याची चिठ्ठी टाका.” तेव्हा योनाथानाच्या नावाची चिठ्ठी निघाली.

43 शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केलेस ते मला सांग.” योनाथानाने सांगितले, “आपल्या हातातील काठीच्या टोकाने मी थोडासा मध चाखला; आता मला मरणे प्राप्त आहे.”

44 शौल म्हणाला, “परमेश्वर असेच करो, किंबहुना ह्याहून अधिक करो; योनाथान, तुला अवश्य मेले पाहिजे.”

45 तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही.

46 शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत गेला, आणि पलिष्टीही आपापल्या ठिकाणी गेले.

47 इस्राएलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी ह्यांच्याशी युद्ध केले. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई.

48 त्याने पराक्रम केला आणि अमालेकी लोकांना जिंकून इस्राएलांस जे जे लुटत असत त्यांच्या हातातून त्यांना सोडवले.

49 शौलाचे पुत्र योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे होते; त्याच्या दोन कन्यांची नावे अशी : थोरलीचे मेरब व धाकटीचे मीखल.

50 शौलाच्या स्त्रीचे नाव अहीनवाम असे होते; ती अहीमास ह्याची कन्या. शौलाचा काका नेर ह्याचा पुत्र अबनेर हा सेनापती होता.

51 शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबियेलाचा पुत्र.

52 शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan