१ शमुवेल 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)शौल अमोन्यांचा पराभव करतो 1 नंतर अम्मोनी नाहाश ह्याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश ह्याला म्हणाले की, “आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.” 2 नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्राएलाची अप्रतिष्ठा करीन, ह्या अटीवर मी तुमच्याशी करार करीन.” 3 याबेशच्या वडील लोकांनी त्याला म्हटले, “आम्हांला सात दिवसांचा अवकाश द्या म्हणजे तेवढ्यात इस्राएल लोकांच्या सर्व प्रांतांत आम्ही जासूद पाठवू; आणि जर आमचा बचाव करण्यासाठी कोणी आला नाही तर मग आम्ही बाहेर निघून तुमच्याकडे येऊ.” 4 मग जासुदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानांवर घातले; ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले. 5 तेव्हा शौल गुरांच्या मागून शेतातून येत होता; त्याने विचारले, “लोक का रडतात? त्यांना काय झाले?” याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळवले. 6 शौलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने येऊन तो मनस्वी संतप्त झाला. 7 त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासुदांच्या हाती इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवले आणि त्यांना निरोप दिला की, “जो कोणी शौल व शमुवेल ह्यांच्यामागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल.” तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले. 8 त्याने बेजेक येथे त्यांची टीप घेतली तेव्हा इस्राएलाचे तीन लक्ष पुरुष व यहूदाचे तीस हजार पुरुष भरले. 9 त्यांनी त्या आलेल्या जासुदांना सांगितले, “तुम्ही याबेश-गिलादाच्या लोकांना जाऊन सांगा की, ‘उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हांला कुमक येऊन पोहचेल.” त्या जासुदांनी जाऊन याबेशच्या लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. 10 मग याबेशच्या लोकांनी सांगून पाठवले की, “आम्ही उद्या बाहेर निघून तुमच्याकडे येऊ, मग तुमच्या मनास येईल तसे आमचे करा.” 11 दुसर्या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी (पहाटे) त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अम्मोन्यांची कत्तल केली; आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दाणादाण केली की त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत. 12 मग लोकांनी शमुवेलास विचारले, “हा शौल आमच्यावर राज्य करणार काय, असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यांना बाहेर काढा म्हणजे आम्ही त्यांना मारून टाकू.” 13 शौल म्हणाला, “आज कोणाही मनुष्याचा वध करायचा नाही; कारण आज परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे.” 14 मग शमुवेल लोकांना म्हणाला, “चला, आपण गिलगालास जाऊ व तेथे राज्याची पुन्हा स्थापना करू.” 15 तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शौलाला राजा केले; तेथे त्यांनी परमेश्वराला शांत्यर्पणाचे यज्ञ केले; शौल व इस्राएल लोक ह्यांनी तेथे मोठा उत्सव केला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India