Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शलमोनाच्या इतर इमारती

1 शलमोनाला आपला वाडा बांधून पूर्ण करण्यास तेरा वर्षे लागली.

2 त्याने लबानोनगृह नावाची इमारत बांधली होती; तिची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती; ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; त्या खांबांवर गंधसरूच्या तुळया ठेवल्या होत्या.

3 खांबांच्या वर एकेका मजल्यावर पंधरा-पंधरा अशा पंचेचाळीस कोठड्या त्याने केल्या होत्या; त्यांना गंधसरूचा कडीपाट होता.

4 तिन्ही मजल्यांवर तुळया असून तिन्ही मजल्यांवर समोरासमोर खिडक्या होत्या.

5 सर्व दारे व त्यांच्या चौकटी चौरस होत्या, तिन्ही मजल्यांवरील खिडक्या समोरासमोर होत्या.

6 आणखी त्याने खांबांची एक देवडी केली होती, तिची लांबी पन्नास हात व रूंदी तीस हात होती; त्या खांबांपुढे एक देवडी केली असून सर्वांपुढे एक ओटी होती; तिला खांब होते.

7 आणि सिंहासनावर बसून न्याय करण्यासाठी एक दिवाणखाना त्याने केला होता; हीच न्यायसभा होय; तिला खालपासून वरपर्यंत गंधसरूची तक्तपोशी केली होती.

8 त्या दिवाणखान्याच्या आतल्या बाजूच्या चौकात त्याचे राहायचे घर होते; तेही वरच्यासारखेच बनवले होते. शलमोनाने फारोच्या कन्येशी लग्न केले होते; तिच्यासाठी ह्या दिवाणखान्यासारखेच घर बांधले होते.

9 ह्या सगळ्या इमारतीस पायापासून मुंढेरीपर्यंत आतून बाहेरून मोलवान ताशीव चिरे लावले होते. ते चिरे मापून करवतींनी चिरून तयार केले होते; बाहेरच्या मोठ्या अंगणात ते लावले होते.

10 त्यांचा पायाही दहा-दहा, आठ-आठ हात लांबीच्या मोठ्या व मोलवान पाषाणांचा घातला होता.

11 त्यांवर मापून तासलेले मोलवान पाषाण व गंधसरूची लाकडे ही होती.

12 मोठ्या अंगणाच्या सभोवार तासलेल्या चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती. परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी ह्यांच्याप्रमाणे ही रचना होती.


मंदिराच्या कामात हीरामाने केलेले सहकार्य
( २ इति. 2:13-14 ; 3:15—5:1 )

13 मग शलमोन राजाने सोर येथून हीरामास बोलावून आणले.

14 तो नफताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता; त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य हे त्याच्या ठायी भरपूर होते; तो शलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला.

15 त्याने पितळेचे अठरा-अठरा हात उंच असे दोन खांब तयार केले; त्या प्रत्येकाला वेढायला बारा हात दोरी लागे.

16 त्याने त्या खांबांच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेचे दोन ओतीव कळस केले. एकेका कळसाची उंची पाच-पाच हात होती.

17 खांबांच्या शेंड्यावरील कळसांना बुट्टीदार जाळ्या आणि साखळीच्या माळा केल्या; एकाला सात व दुसर्‍याला सात.

18 ह्या प्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेंड्यांवर प्रत्येक कळसाला झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबांच्या दोन रांगा केल्या.

19 जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.

20 प्रत्येक खांबाच्या शेंड्यावर जाळीला लागून असलेल्या गोलाईच्या जवळ आणखी एक कळस केला होता; आणि प्रत्येक कळसावर ओळीने दोनशे डाळिंबांच्या रांगा काढल्या होत्या.

21 हे खांब त्याने मंदिराच्या देवडीजवळ उभे केले होते; उजवीकडला खांब उभा केला त्याला याखीन (तो स्थापील) हे नाव दिले होते व डाव्या बाजूला खांब उभा केला त्याला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) हे नाव दिले होते.

22 खांबांच्या शेंड्यावर कमळे काढलेली होती; खांबांचे काम अशा प्रकारे संपले.

23 मग त्याने एक गंगाळसागर ओतवला होता; त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्याचा परीघ तीस हात होता.

24 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतराने दहा-दहा इंद्रावणे कोरली होती, ती त्या सगळ्या गंगाळसागरासभोवती होती, हा गंगाळसागर ओतला तेव्हाच इंद्रावणांच्या ह्या दोन रांगा त्याच्या अंगच्याच ठेवल्या होत्या.

25 हा गंगाळसागर बारा बैलांवर ठेवला होता; त्यांपैकी तीन उत्तराभिमुख, तीन पश्‍चिमाभिमुख, तीन दक्षिणाभिमुख, व तीन पूर्वाभिमुख होते; त्यांच्यावर तो गंगाळसागर ठेवला असून त्या सर्वांचे मागले भाग आतल्या अंगाला होते.

26 त्याची जाडी वीतभर होती; त्याचा काठ कटोर्‍याच्या काठासारखा असून त्यावर कमलपुष्पे कोरली होती; त्यात दोन हजार बथ1 पाणी राहत असे.

27 त्याने पितळेचे दहा चौरंग केले होते; प्रत्येक चौरंगाची लांबी चार हात, रुंदी चार हात व उंची तीन हात होती.

28 चौरंगाची घडण येणेप्रमाणे होती; त्याला पत्रे लावले होते आणि ह्या पत्र्यांना सभोवार कंगोरे होते;

29 कंगोर्‍यांमधल्या पत्र्यांवर सिंह, बैल व करूब ह्यांच्या आकृती कोरल्या होत्या; त्या कंगोर्‍यावर एक बैठक होती; आणि सिंहाच्या व बैलांच्या खाली लोंबत्या माळा कोरल्या होत्या.

30 प्रत्येक चौरंगाला पितळेची चार-चार चाके व पितळेच्या धुर्‍या केल्या होत्या. प्रत्येकाच्या चार्‍ही पायांना लागून ओतीव खांदे होते; ते खांदे गंगाळ ठेवण्यासाठी वरच्या भागी ओतून जोडले होते; त्यांच्या बाजू माळांनी शृंगारल्या होत्या.

31 कळसांच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते; हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता; त्याच्यावरही काही कोरीव काम होते; त्याच्या पट्ट्या गोल नसून चौकोनी होत्या.

32 चार्‍ही चक्रे पट्ट्यांच्या खाली होती. आणि प्रत्येक चक्राच्या धुर्‍या तळाशी जोडल्या होत्या; त्या प्रत्येक चक्राची उंची दीड हात होती.

33 चक्राची घडण रथचक्रासारखी होती; त्यांच्या धुर्‍या, पुठ्ठे, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव होते.

34 प्रत्येक चौरंगाच्या चार्‍ही कोपर्‍यांना चार खांदे होते; हे खांदे व चौरंग दोन्ही अखंड होते.

35 प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते; आणि त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्ट्या चौरंगाशी अखंड होत्या.

36 त्या टेकाव्यांच्या पृष्ठभागावर व पत्र्यांवर त्यांच्या-त्यांच्या परिमाणाप्रमाणे करूब, सिंह, व खजुरीची झाडे कोरली होती व सभोवार माळा दाखवल्या होत्या.

37 ह्या प्रकारे त्यांनी ते दहा चौरंग केले; ते सर्व एकाच साच्याचे, एकाच मापाचे व एकाच आकाराचे होते.

38 आणखी त्याने पितळेची दहा गंगाळे केली होती; एकेका गंगाळात चाळीस-चाळीस बथ पाणी राहत असे; त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता; त्या दहा चौरंगांतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.

39 त्याने पाच गंगाळे मंदिराच्या दक्षिणेस व पाच गंगाळे उत्तरेस ठेवली होती; आणि गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे, आग्नेयेस ठेवला होता.

40 तसेच हीरामाने गंगाळे, फावडी व कटोरी ही बनवली. ह्या प्रकारे हीरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले ते असे :

41 दोन खांब, त्या खांबांच्या शेंड्यांवरील कळसांचे प्याल्याच्या आकाराचे भाग व त्या दोन्ही खांबांच्या शेंड्यांवरील कळसाचे प्याल्याच्या आकाराचे भाग झाकण्यासाठी जाळ्या केल्या;

42 त्या दोन जाळ्यांसाठी चारशे डाळिंबे केली; खांबांच्या शेंड्यांवरील प्याल्याच्या आकाराच्या कळसांचे भाग झाकायच्या जाळ्यांसाठी ह्या डाळिंबाच्या दोन-दोन रांगा होत्या;

43 दहा चौरंग व त्यांच्यावरील दहा गंगाळे;

44 आणि एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल.

45 तशीच पात्रे, फावडी व कटोरे ही बनवली होती; परमेश्वराच्या मंदिरातील ही जी पात्रे हीरामाने शलमोन राजासाठी बनवली होती ती सर्व उजळ पितळेची होती.

46 राजाने ती यार्देन खोर्‍यात सुक्कोथ व सारतान ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली होती.

47 ती पात्रे पुष्कळ असल्यामुळे शलमोनाने ती वजन केल्यावाचून ठेवली होती, पितळेचे वजन केले नव्हते;

48 परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शलमोनाने करवली ती ही : वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती;

49 गाभार्‍यासमोरील उजवीकडल्या पाच व डावीकडल्या पाच समया शुद्ध सोन्याच्या करवल्या होत्या; त्यांचा पुष्पशृंगार, चाडी व चिमटे ही सोन्याची करवली होती;

50 पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती.

51 ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिराचे जे जे काम शलमोन राजाने हाती घेतले ते समाप्त झाले. नंतर आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी आणि पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan