Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शलमोनाला दाविदाने दिलेली ताकीद

1 दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला ताकीद देऊन म्हटले,

2 “मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव.

3 तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल.

4 आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.

5 सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.

6 तर तू आपल्या बुद्धीचा उपयोग कर; त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नकोस.

7 पण गिलादी बर्जिल्लय ह्याच्या पुत्रांवर कृपादृष्टी ठेव, आणि ते तुझ्या पंक्तीला बसणार्‍यांतले असावेत; कारण तुझा भाऊ अबशालोम ह्याच्यापासून मी पळून जात होतो तेव्हा त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली.

8 तसेच तुझ्या पदरी बन्यामिनी गेराचा पुत्र बहूरीमकर शिमी हा आहे; मी महनाइमाला जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले; पण तो माझ्या भेटीला यार्देनेजवळ आला, तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याच्याशी आणभाक केली की मी तुझ्यावर तलवार धरणार नाही.

9 तरी तू त्याला निर्दोष समजू नकोस; तू सुज्ञ पुरुष आहेस; त्याचे काय करावे हे तुला समजेलच; त्या पिकलेल्या केसाच्या म्हातार्‍याला रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव.”


दाविदाचा मृत्यू
( १ इति. 29:26-30 )

10 नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली.

11 दाविदाने इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात व तेहेतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.

12 मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्याला चांगली बळकटी आणली.


शलमोन आपल्या राज्याला बळकटी आणतो

13 मग हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे आला; तेव्हा ती त्याला म्हणाली, “तू मित्रभावाने आला आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मी मित्रभावाने आलो आहे.

14 मग तो म्हणाला “मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “बोल.”

15 तो म्हणाला, “तुला ठाऊक आहेच की मला राज्य मिळाले होते आणि मी राज्य करावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे माझ्याकडे लागले होते, पण आता राज्यक्रांती होऊन ते माझ्या बंधूस मिळाले आहे. कारण परमेश्वराकडून ते त्याला मिळाले आहे.

16 आता मी तुझ्याजवळ एक विनंती करीत आहे, तू मला नाही म्हणू नकोस.” ती म्हणाली, “बोल.”

17 तो म्हणाला, “शलमोन राजा तुला नाही म्हणणार नाही; त्याला सांग की मला शुनेमकरीण अबीशग बायको करून दे.”

18 बथशेबा म्हणाली, “बरे, मी तुझ्या वतीने राजाजवळ बोलेन.”

19 बथशेबा अदोनीयाच्या वतीने शलमोन राजाकडे बोलायला गेली. राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला; त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडायला सांगितले, व ती त्याच्या उजवीकडे बसली.

20 ती त्याला म्हणाली, “मी तुझ्याजवळ एक लहानशी गोष्ट मागत आहे. तू मला नाही म्हणू नकोस.” राजा तिला म्हणाला, “आई, माग, मी तुला नाही म्हणणार नाही.”

21 ती म्हणाली, “शुनेमकरीण अबीशग ही तुझा भाऊ अदोनीया ह्याला बायको करून दे.”

22 शलमोन राजाने आपल्या आईस उत्तर दिले, “अदोनीयासाठी तू शुनेमकरीण अबीशग हीच तेवढी का मागतेस! तो माझा वडील बंधू आहे त्या अर्थी त्याच्यासाठी किंबहुना अब्याथार याजक व सरूवेचा पुत्र यवाब ह्यांच्यासाठी राज्यदेखील माग.”

23 शलमोन राजाने परमेश्वराची शपथ वाहून म्हटले, “अदोनीयाने ही जी मागणी केली आहे तिच्यामुळे त्याने आपल्या प्राणावर संकट आणले आहे, तसे न घडले तर परमेश्वर माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक अनिष्ट करो.

24 ज्या परमेश्वराने माझी स्थापना केली, माझा बाप दावीद ह्याच्या गादीवर मला बसवले आणि आपल्या वचनानुसार माझे घराणे स्थापन केले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आजच्या आज अदोनीयास देहान्त शासन होईल.”

25 शलमोन राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला पाठवले; त्याने त्याच्यावर असा हल्ला केला की तो प्राणास मुकला.

26 अब्याथार याजकाला राजा म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेतीवाडीत जाऊन राहा; तू मरणदंडास पात्र आहेस तरी मी आज तुला मारून टाकत नाही, कारण माझा बाप दावीद ह्याच्यासमक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असायचास आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असायचास.”

27 एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शलमोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकले.

28 हे वर्तमान यवाबाकडे जाऊन पोहचले; यवाब हा अबशालोमाच्या पक्षाकडे वळला नव्हता; तरी तो अदोनीयाच्या पक्षाकडे वळला होता. यवाब हा परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीची शिंगे धरून राहिला.

29 “तो परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीजवळ आहे” हे वर्तमान शलमोन राजाला कळले तेव्हा त्याने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला पाठवले, तो त्याला म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”

30 बनायाने परमेश्वराच्या मंडपानजीक जाऊन त्याला म्हटले, “राजा म्हणतो बाहेर निघून ये.” तो म्हणाला, “नाही, मी येथेच मरेन.” मग बनायाने राजाकडे परत येऊन सांगितले की यवाबाने मला असे असे उत्तर दिले.

31 राजा त्याला म्हणाला, “त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला मारून टाक व त्याला मूठमाती दे, म्हणजे यवाबाने विनाकारण रक्तपात केला आहे ह्या दोषाचे माझ्यावरून व माझ्या बापाच्या घराण्यावरून तू निवारण करशील.

32 त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.

33 त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी व त्याच्या संततीच्या शिरी उलटून सदोदित राहील. तथापि दावीद, त्याचा वंश, त्याचे घराणे व त्याची गादी ह्यांना परमेश्वराकडून सर्वकाळ शांती प्राप्त होईल.”

34 यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने जाऊन यवाबावर हल्ला करून त्याला ठार मारले, आणि रानातील त्याच्या स्वतःच्या घरी त्याला मूठमाती दिली.

35 राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले.

36 राजाने शिमीला बोलावून आणून सांगितले, “तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नकोस.

37 ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के समज; तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल.”

38 शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, माझ्या स्वामीराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला दास करील.” शिमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहिला;

39 पण तीन वर्षे लोटल्यावर शिमीचे दोन दास गथचा राजा आखीश बिन माका ह्याच्याकडे पळून गेले; तेव्हा “तुझे दास गथ येथे आहेत” अशी कोणी त्याला खबर दिली.

40 मग शिमी आपल्या गाढवांवर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास आखीशाकडे गेला व त्यांना तेथून घेऊन आला.

41 शिमी यरुशलेमेहून गथास गेला होता व आता परत आला आहे हे वर्तमान शलमोनाला सांगण्यात आले;

42 तेव्हा राजाने शिमीला बोलावून आणून म्हटले, “‘ज्या दिवशी तू येथून निघून कोठेही जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणाला मुकशील हे पक्के ध्यानात ठेव’ असे मी तुला परमेश्वराची शपथ घालून बजावून सांगितले होते ना? आणि तू मला असे म्हणाला होतास ना की, ‘जे मी आता ऐकले ते ठीक आहे?’

43 तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम हे तू का मानले नाहीत?”

44 राजा शिमीला म्हणाला, “माझा बाप दावीद ह्याच्याशी जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जिवाला ठाऊक आहे, तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईल असे करील.

45 शलमोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील.”

46 राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणाला मुकला. शलमोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan