१ राजे 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हनानीचा पुत्र येहू ह्याला बाशाच्या विरुद्ध परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : 2 “मी तुला धुळीतून वर काढून माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती केले आहे, तरी तू यराबामाच्या मार्गाने चालला आहेस, तू माझ्या इस्राएल लोकांकडून पाप करवले आहेस, व त्यांनी आपल्या पातकांनी मला संतप्त केले आहे. 3 तर पाहा, बाशा व त्याचे घराणे ह्यांचा मी अगदी नायनाट करीन; आणि नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या घराण्यासारखे तुझ्या घराण्याचे करीन. 4 बाशाचा जो कोणी नगराच्या आत मरेल त्याला कुत्री खाऊन टाकतील; त्यांच्यातला जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातील पक्षी खाऊन टाकतील.” 5 बाशाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 6 बाशा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व तिरसा येथे त्याला मूठमाती दिली; आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र एला राजा झाला. 7 परमेश्वराचे वचन हनानीचा पुत्र येहू संदेष्टा ह्याच्या द्वारे बाशा व त्याचे घराणे ह्यांच्याविरुद्ध प्राप्त झाले; ह्याचे कारण हे की बाशाने यराबामाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून परमेश्वराला संताप आणला व त्याने नादाबास ठार मारले. एलाची कारकीर्द 8 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी बाशाचा पुत्र एला हा तिरसा येथे इस्राएलांवर राज्य करू लागला; त्याने इस्राएलांवर दोन वर्षे राज्य केले. 9 त्याचा चाकर जिम्री, जो त्याच्या निम्म्या रथांवर अधिकारी होता, त्याने त्याच्याविरुद्ध फितुरी केली. एला तिरसा येथे असताना तिरसातल्या मंदिराचा त्याचा कारभारी अरसा ह्याच्या घरी दारू पिऊन तो मस्त झाला; 10 तेव्हा जिम्रीने आत जाऊन त्याला ठार मारले; यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी हे झाले. 11 तो राज्य करू लागला, आणि गादीवर बसताच त्याने बाशाच्या सर्व घराण्याचा संहार केला; त्याच्या आप्तमित्रांपैकी एक मुलगादेखील त्याने सोडला नाही. 12 ह्या प्रकारे परमेश्वराने जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे बाशाच्या विरुद्ध सांगितले होते त्यानुसार जिम्रीने त्याच्या सर्व घराण्याचा नाश केला; 13 बाशाची सर्व पातके व त्याचा पुत्र एला ह्याचीही सर्व पातके जी त्यांनी स्वतः केली व इस्राएलाकडून करवून त्यांना व्यर्थ गोष्टींच्या नादी लावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला त्यामुळे असे झाले. 14 एलाने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? जिम्रीची कारकीर्द 15 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्री हा तिरसा येथे राज्य करू लागला; त्याने तिरसात सात दिवस राज्य केले. ह्या वेळी लोक पलिष्ट्यांच्या ताब्यातल्या गिब्बथोन नगराजवळ ठाणे देऊन राहिले होते. 16 जिम्रीने फितुरी करून राजाला मारून टाकले आहे असे ह्या ठाणे देऊन राहिलेल्या लोकांनी ऐकले त्याच दिवशी सर्व इस्राएलाने अम्री नामे मुख्य सेनापतीला छावणीतच इसाएलाचा राजा केले. 17 अम्रीने सर्व इस्राएलास बरोबर घेऊन गिब्बथोन सोडून तिरसास वेढा घातला. 18 नगर हस्तगत झाले असे जिम्रीने पाहिले तेव्हा तो राजवाड्याच्या बुरुजात गेला व त्याने राजवाड्यास आग लावून दिली आणि त्यात तो स्वतःही जळून मेला. 19 त्याने यराबामाचे अनुकरण केले व जे पाप त्याने इस्राएलाकडून करवले त्याच पापाच्या मार्गाने तो चालला; अशी पातके करून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले म्हणून असे झाले. 20 जिम्रीने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली फितुरी ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अम्रीची कारकीर्द 21 तेव्हा इस्राएल लोकांचे दोन भाग झाले; अर्धे लोक गीनथाचा पुत्र तिब्नी ह्याला राजा करावे म्हणून त्याच्या पक्षाचे झाले, व अर्धे लोक अम्रीच्या पक्षाचे झाले. 22 अम्रीच्या पक्षाच्या लोकांनी गीनथपुत्र तिब्नी ह्याच्या पक्षाचा पराभव केला; तिब्नी प्राणास मुकला आणि अम्रीला राजपद मिळाले. 23 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी अम्री इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले; पहिली सहा वर्षे त्याने तिरसा येथे राज्य केले. 24 त्याने शेमर ह्याच्याकडून शोमरोन डोंगर दोन किक्कार1 रुपे देऊन घेतला; त्या डोंगरावर त्याने एक नगर वसवले आणि त्या वसवलेल्या नगराला त्या डोंगराचा मूळचा मालक शेमर ह्याच्या नावावरून शोमरोन असे नाव दिले. 25 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते अम्रीने केले; त्याच्यापूर्वी जे होऊन गेले त्या सर्वांहून अधिक दुष्टाचार त्याने केला. 26 नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या सर्व मार्गांचे त्याने अवलंबन केले आणि जी पातके यराबामाने स्वतः करून इस्राएलाकडून करवली व त्यांना व्यर्थ गोष्टींच्या नादी लावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला, ती सर्व पातके त्याने केली. 27 अम्रीने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने दाखवलेला पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे; नाही काय? 28 अम्री आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, आणि त्याला शोमरोन येथे मूठमाती दिली, आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र अहाब राजा झाला. अहाबाची कारकीर्द 29 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर शोमरोन येथे बावीस वर्षे राज्य केले. 30 अम्रीचा पुत्र अहाब ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. 31 नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला. 32 त्याने बआलाचे एक भवन शोमरोन येथे बांधले व त्यात बआलाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली. 33 अहाबाने अशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणण्याजोगी कामे आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या सर्व राजांहून अधिक केली. 34 त्याच्या कारकिर्दीत बेथेलकर हिएल ह्याने यरीहो नगर पुन्हा वसवले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबीराम मरण पावला; आणि त्याने त्याच्या वेशी उभारल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला; परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India