१ राजे 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)अबीयामाची कारकीर्द ( २ इति. 13:1-22 ) 1 नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाम यहूदावर राज्य करू लागला. 2 त्याने तीन वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव माका, ती अबीशालोमाची कन्या. 3 त्याच्यापूर्वी त्याच्या बापाने जी पातके केली त्या सर्व पातकांचे अनुकरण त्याने केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याचे चित्त त्याचा देव परमेश्वर ह्याच्याकडे जसे पूर्णपणे होते तसे त्याचे नव्हते. 4 तथापि दाविदाकरता त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला; त्याच्या पश्चात् त्याच्या पुत्राची त्याने स्थापना केली; आणि यरुशलेम नगर सुस्थितीत ठेवले; 5 कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरीया हित्ती ह्याच्या प्रकरणाखेरीज तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही. 6 अबीयामाच्या सगळ्या हयातीत अबीयाम2 व यराबाम ह्यांच्यामधली लढाई चालू राहिली. 7 अबीयामाने केलेल्या इतर गोष्टींचे व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अबीयाम व यराबाम ह्यांची लढाई चालूच होती. 8 अबीयाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्यांनी दावीदपुरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला. आसाची कारकीर्द ( २ इति. 14:1-5 ; 15:16-19 ) 9 इस्राएलाचा राजा यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदावर राज्य करू लागला. 10 त्याने एकेचाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव माका; ही अबीशालोमाची कन्या. 11 आसाने आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले. 12 त्याने पुरुषगमन करणार्यांना देशातून घालवून दिले आणि त्याच्या वाडवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या. 13 त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती. तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली. 14 त्याने उच्च स्थाने मोडून टाकली नाहीत; तथापि आसाचे मन सार्या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते. 15 त्याच्या बापाने व त्याने स्वतः सोने, चांदी व पात्रे परमेश्वराला वाहिली होती ती सर्व त्याने परमेश्वराच्या मंदिरात नेऊन ठेवली. बेन-हदादाबरोबर आसाने केलेला सलोखा ( २ इति. 16:1-14 ) 16 आसा व इस्राएलाचा राजा बाशा ह्यांच्यामध्ये आमरण लढाई चालली होती. 17 इस्राएलाचा राजा बाशा ह्याने यहूदावर स्वारी केली; यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे कोणाच्याही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्राएलाचा राजा बाशा ह्याने रामा नगराची मजबुती केली. 18 परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारात सोने व चांदी राहिली होती ती सर्व काढून आसाने आपल्या सेवकांच्या हाती दिली व त्यांना दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद बिन टब्रिम्मोन बिन हेज्योन ह्याच्याकडे पाठवले; त्याने त्याला असे सांगून पाठवले की, 19 “माझ्या बापाचा व तुमच्या बापाचा सलोखा होता तसा तुमचा व आमचा सलोखा होवो; तर पाहा, मी तुम्हांला सोन्याचांदीची भेट पाठवली आहे; इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्याशी केलेला करार तुम्ही मोडून टाका म्हणजे तो माझ्यामागे लागण्याचे सोडून देईल.” 20 आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सेनांच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-बेथ-माका, सगळा किन्नेरोथ व नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला. 21 हे ऐकून रामा शहराची मजबुती करण्याचे सोडून बाशा तिरसा येथे जाऊन राहिला. 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व लोकांना जाहीर केले, कोणाला सोडले नाही; बाशाने जे पाषाण व लाकडे लावून रामाची मजबुती केली होती ती सर्व त्या लोकांनी काढून नेली आणि आसा राजाने बन्यामिनाचा गिबा व मिस्पा ह्यांची मजबुती करण्याच्या कामी ती लावली. 23 आसाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याचा पराक्रम, त्याने जे काही केले ते व त्याने बांधलेली नगरे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शेवटी वृद्धापकाळी त्याच्या पायांना काही विकार झाला. 24 आसा आपल्या पितरांजवळ निजला, व लोकांनी त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या नगरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली; आणि त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला. नादाबाची कारकीर्द 25 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यराबामाचा पुत्र नादाब हा इस्राएलावर राज्य करू लागला; इस्राएलावर त्याने दोन वर्षे राज्य केले. 26 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याने आपल्या बापाचे अनुकरण केले; त्याच्या बापाने इस्राएलांकडून जे पाप करवले त्याच पापाच्या मार्गाने तोही चालला. 27 त्याच्याविरुद्ध इस्साखार घराण्यातील अहीयाचा पुत्र बाशा ह्याने फितुरी केली; बाशाने त्याला पलिष्ट्यांचे गिब्बथोन येथे ठार मारले; नादाब व सर्व इस्राएल ह्यांनी त्या वेळी गिब्बथोनास वेढा घातला होता. 28 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बाशाने नादाबाला ठार मारले, व तो त्याच्या जागी राजा झाला. 29 राजा होताच त्याने यराबामाच्या सर्व घराण्याचा संहार केला; त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांचा नाश केला. त्यांतील एकही प्राणी जिवंत ठेवला नाही. परमेश्वराने आपला सेवक शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे सर्व झाले. 30 ह्याचे कारण हेच की, यराबामाने स्वतः पापकर्मे करून इस्राएलासही ती करायला लावली आणि त्याने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला. 31 नादाबाने केलेल्या बाकीच्या सर्व गोष्टी, त्याने जे काही केले ते, ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 32 आसा व इस्राएलाचा राजा बाशा ह्यांची त्यांच्या सार्या हयातीत लढाई चालली होती. बाशाची कारकीर्द 33 यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा तिरसा येथे सर्व इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने चोवीस वर्षे राज्य केले. 34 त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; त्याने यराबामाचे अनुकरण केले व जे पातक त्याने इस्राएलाकडून करवले त्या पातकांच्या मार्गाने तो चालला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India