Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अबीशग दाविदाची शुश्रूषा करते

1 दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता; ते त्याच्यावर पांघरुणे घालत तरी त्याला ऊब येत नसे.

2 तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “आमच्या स्वामीराजांसाठी एखादी तरुण कुमारी पाहावी; तिने तैनातीला राहून आमच्या स्वामीराजांची शुश्रूषा करावी आणि त्यांना ऊब यावी म्हणून त्यांच्या उराशी निजावे.”

3 मग त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला; तेव्हा त्यांना शुनेमकरीण अबीशग नावाची एक कुमारी आढळली. तिला ते राजाकडे घेऊन आले.

4 ती तरुणी फार सुंदर होती; ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली; पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. अदोनीया गादी हिरावून घेतो

5 त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.

6 “तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.

7 त्याने सरूवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक ह्यांच्याशी बोलणे केले. ते अदोनीया ह्याच्या पक्षाचे होऊन त्याला मदत करणारे झाले.

8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत.

9 अदोनीयाने एन-रोगेलजवळचा जोहेलेथ खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशू ह्यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहूदी सेवक ह्यांना आमंत्रण केले;

10 पण नाथान संदेष्टा, बनाया, शूर वीर व आपला भाऊ शलमोन ह्यांना त्याने आमंत्रण केले नाही.

11 मग शलमोनाची आई बथशेबा हिला नाथान म्हणाला, “आपला स्वामी दावीद ह्याला नकळत हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा होऊन बसला आहे हे तू ऐकले नाहीस काय?

12 तर मी तुला आता मसलत देतो; तिच्या योगे तू आपला व आपला पुत्र शलमोन ह्याचा प्राण वाचवशील.

13 तू दावीद राजाकडे जाऊन त्याला विचार : ‘माझे स्वामीराजे, माझा पुत्र शलमोन हा खात्रीने आपल्यामागे राजा होईल आणि आपल्या गादीवर बसेल अशी आणभाक आपण आपल्या दासीशी केली आहे ना? तर अदोनीया कसा राजा होऊन बसला आहे.’

14 तू राजाशी भाषण करत आहेस तोच मी तुझ्यामागून आत येईन व तुझ्या बोलण्याला पुष्टी देईन.”

15 मग बथशेबा खोलीत राजाकडे गेली; राजा फार वृद्ध झाला होता, त्याची सेवा शुनेमकरीण अबीशग ही करीत होती.

16 बथशेबेने राजाला लवून मुजरा केला. त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”

17 तिने म्हटले, “माझे स्वामी, आपण आपला परमेश्वर देव ह्याची आणभाक करून आपल्या दासीला म्हटले होते की, तुझा पुत्र शलमोन माझ्यामागे राजा होऊन माझ्या गादीवर खास बसेल.

18 पण आता अदोनीया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामीराजांना ठाऊकदेखील नाही.

19 त्याने विपुल बैल, पुष्ट पशू व मेंढे ह्यांचा यज्ञ केला आणि सर्व राजकुमार, अब्याथार याजक व सेनापती यवाब ह्यांना आमंत्रण केले, पण आपला दास शलमोन ह्याला त्याने आमंत्रण केले नाही.

20 माझ्या स्वामीराजानंतर गादीवर कोणी बसावे हे आपल्या तोंडून समजावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे आपल्याकडे लागले आहेत.

21 नाहीतर जेव्हा आमचे स्वामीराजे आपल्या पितरांजवळ जाऊन निजतील तेव्हा मी व माझा पुत्र शलमोन ह्यांना गुन्हेगार गणतील.”

22 ती राजाशी बोलत असता नाथान संदेष्टाही आत आला.

23 लोक राजाला म्हणाले, “पाहा, नाथान संदेष्टा आला आहे.” त्याने राजासमोर होऊन त्याला भूमीपर्यंत लवून मुजरा केला.

24 नाथान म्हणाला, “हे माझ्या स्वामीराजा, अदोनीया माझ्यामागे राजा होईल व तो माझ्या गादीवर बसेल असे तू सांगितले आहेस काय?

25 पाहा, आज त्याने खाली जाऊन पुष्कळ बैल, पुष्ट पशू व मेंढे ह्यांचा यज्ञ केला असून सर्व राजकुमार, सेनेचे सरदार व अब्याथार याजक ह्यांनाही आमंत्रण केले; ते आमच्यासमोर खाऊनपिऊन म्हणत आहेत, अदोनीया राजा चिरायू होवो!

26 पण त्याने मला, तुझ्या सेवकाला आणि सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया व तुझा सेवक शलमोन ह्यांना आमंत्रण केले नाही.

27 हे सर्व माझ्या स्वामीराजांकडून झाले आहे काय? माझ्या स्वामीराजांमागे गादीवर कोणी बसावे हे तू आपल्या दासांना कळवले नाही.”


शलमोनाचा राज्याभिषेक

28 दावीद राजा म्हणाला, “बथशेबेस माझ्याकडे बोलवा.” ती राजाच्या हुजुरास येऊन त्याच्यासमोर उभी राहिली.

29 तेव्हा राजाने आणभाक करून म्हटले, “ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटांतून सोडवला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,

30 मी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेऊन तुला म्हटले होते की तुझा पुत्र शलमोन माझ्यामागे राजा होईल व तोच माझ्या जागी गादीवर बसेल; मी आज निश्‍चये तसेच करणार.”

31 तेव्हा बथशेबेने भूमीपर्यंत लवून राजाला मुजरा करून म्हटले, “माझे स्वामीराज दावीद चिरायू होवोत.”

32 मग दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा व यहोयादाचा पुत्र बनाया ह्यांना माझ्याकडे बोलावून आणा.” तेव्हा ते राजासमोर आले.

33 राजा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वामींचे सेवक बरोबर घ्या आणि माझा पुत्र शलमोन ह्याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन जा;

34 तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेमावे, आणि कर्णा वाजवून, शलमोन राजा चिरायू होवो असे पुकारावे.

35 मग तुम्ही त्याच्यामागे चालत इकडे या व तो येथे येऊन माझ्या सिंहासनावर बसेल; तोच माझ्या जागी राजा होईल; इस्राएल व यहूदा ह्यांचा तो अधिपती म्हणून मी त्याला नेमले आहे.”

36 यहोयादाचा पुत्र बनाया म्हणाला, “आमेन, माझ्या स्वामीराजांचा देव परमेश्वर ह्याचेही असेच म्हणणे आहे.

37 परमेश्वर माझ्या स्वामीराजांबरोबर राहिला तसाच तो शलमोनाबरोबर राहो, व त्याच्या गादीचा महिमा माझे स्वामीराजे दावीद ह्यांच्या गादीहून अधिक वाढवो.”

38 तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी ह्यांना बरोबर घेऊन खाली गेले आणि शलमोनाला दावीद राजाच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन गेले.

39 तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शिंग घेऊन शलमोनाला अभिषेक केला आणि कर्णा वाजवला; तेव्हा “शलमोन राजा चिरायू होवो” असा लोकांनी घोष केला.

40 मग सर्व लोक त्याच्यामागे चालले; ते वाजंत्री वाजवत होते व आनंदाचा गजर करत होते, त्या नादाने पृथ्वी दणाणली.

41 इकडे अदोनीया व त्याचे सर्व आमंत्रित ह्यांचे भोजन आटोपले होते; इतक्यात त्यांच्या कानी हा ध्वनी पडला. यवाबाने रणशिंगाचा आवाज ऐकून म्हटले, “नगरात गलबल्याचा आवाज येतोय तो कसला?”

42 तो असे बोलत आहे इतक्यात अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान आला; अदोनीया त्याला म्हणाला, “आत ये, तू भला पुरुष आहेस, तू चांगले वर्तमान आणले असावेस.”

43 योनाथानाने अदोनीयास सांगितले, “आपला स्वामीराजा दावीद ह्याने शलमोनाला खरोखर राजा केले आहे.

44 त्याच्याबरोबर सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी व पलेथी ह्यांना राजाने पाठवले व त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले;

45 आणि सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला गीहोन येथे राज्याभिषेक केला व ते तेथून एवढा जयघोष करीत वर गेले की नगर अगदी दणाणून गेले; तुमच्या कानी ध्वनी पडला तो हाच.

46 शलमोन राजासनावर विराजमान झाला आहे;

47 आपला स्वामीराजा दावीद ह्याच्याकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की, ‘आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो.’ तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले.

48 राजाने असेही म्हटले की, “ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांदेखत एकाला माझ्या गादीवर बसवले तो इस्राएलाचा देव धन्य!”’

49 तेव्हा अदोनीयाचे सगळे पाहुणे घाबरून गेले आणि वाट सापडेल तिकडे पळत सुटले.

50 अदोनीयाला शलमोनाची दहशत वाटली व तो जाऊन वेदीची शिंगे धरून राहिला.

51 शलमोनाला कोणी जाऊन सांगितले की, “अदोनीयाला शलमोन राजाची दहशत वाटते आहे; पाहा, तो वेदीची शिंगे धरून राहिला आहे; तो म्हणत आहे की, आपल्या दासाला तलवारीने वधणार नाही अशी आणभाक शलमोनाने आज करावी.”

52 शलमोन म्हणाला, “तो भला मनुष्य आहे असे दिसल्यास त्याचा एक केसही जमिनीवर पडणार नाही, पण त्याच्या ठायी दुष्टता दिसून आली तर तो प्राणाला मुकेल.”

53 मग शलमोन राजाने काही लोक पाठवून त्याला वेदीपासून आणवले. त्याने येऊन शलमोन राजाला मुजरा केला; आणि शलमोन त्याला म्हणाला, “तू आपल्या घरी जा.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan