Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ करिंथ 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय

1 मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.

2 मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.

3 मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.

4 प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही;

5 ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही;

6 ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते;

7 ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.

8 प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.

9 कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो;

10 पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.

11 मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.

12 कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.

13 सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan