Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मंदिराच्या उभारणीचे काम दावीद शलमोनावर सोपवतो

1 इस्राएलाचे सर्व सरदार म्हणजे वंशावंशांचे सरदार, राजाची पाळीपाळीने सेवा करणार्‍या तुकड्यांचे सरदार होते; तसेच सहस्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या संपत्ती व पशुधनावर देखरेख करणारे सरदार आणि शूर वीर ह्या सर्वांना दाविदाने यरुशलेम येथे जमवले.

2 मग दावीद राजा उभा राहून म्हणाला, “माझे बांधव व माझे प्रजाजनहो, माझे म्हणणे ऐका; परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पादासनासाठी एक विश्रामभवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची मी तयारी केली होती;

3 परंतु देवाने मला म्हटले, ‘माझ्या नामाप्रीत्यर्थ तुला मंदिर बांधायचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहेस;’

4 परंतु इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे; मी इस्राएलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहूदाने अग्रणी व्हावे आणि यहूदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली आणि माझ्या पित्याच्या पुत्रांतून मलाच सर्व इस्राएलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले.

5 परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.

6 तो मला म्हणाला, ‘तुझा पुत्र शलमोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील; त्याला मी आपला पुत्र निवडले आहे व मी त्याचा पिता होईन.

7 तो जर माझ्या आज्ञा व निर्णय हल्लीच्याप्रमाणे निश्‍चयाने पाळील तर मी त्याचे राज्य निरंतर स्थापीन.’

8 तर आता सर्व इस्राएलांसमक्ष, परमेश्वराच्या मंडळीसमक्ष, आमच्या देवाच्या विद्यमाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवून त्या पाळा म्हणजे तुम्ही ह्या उत्तम देशाचे मालक व्हाल व आपल्यामागे आपल्या मुलांना हा देश कायमचे वतन ठेवून जाल.

9 हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.

10 सांभाळ, पवित्रस्थानाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे म्हणून परमेश्वराने तुला निवडले आहे; हिंमत धरून हे कार्य कर.”

11 मग दाविदाने आपला पुत्र शलमोन ह्याला मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्यांवरील कोठड्या व दयासनाचे स्थान ह्यांचा नमुना दिला;

12 त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे ह्यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्याला मिळाले होते ते सर्व त्याने त्याला दिले.

13 त्याप्रमाणेच याजक व लेवी ह्यांच्या कार्यक्रमाचा, परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसंबंधाच्या सर्व कामाचा आणि सेवेसंबंधाच्या सर्व पात्रांचा बेत त्याने त्याला सांगून दिला;

14 सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी सोन्याची पात्रे करण्यास सोने आणि सर्व प्रकारच्या सेवेसाठी लागणार्‍या चांदीच्या पात्रांसाठी चांदी त्याने तोलून दिली;

15 सोन्याच्या दीपमाळा व त्यांची सोन्याची चाडी; प्रत्येक दीपमाळ व तिची चाडी ह्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे चांदी तोलून दिली.

16 समर्पित भाकरीच्या प्रत्येक मेजासाठी सोने तोलून दिले, चांदीच्या मेजासाठी चांदी तोलून दिली.

17 शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली.

18 धूपवेदीसाठी गाळलेले सोने तोलून दिले, आणि करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकत, त्यांच्या रथाच्या नमुन्यासाठी सोने त्याने दिले.

19 “परमेश्वराकडून जे काही ह्या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे.” [असे दाविदाने म्हटले.]

20 मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.

21 पाहा, देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी याजक व लेवी ह्यांचा कार्यक्रम नेमून दिला आहे आणि सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी हरप्रकारचे काम मनापासून करणारे कुशल पुरुषही तुझ्याबरोबर असतील; त्याप्रमाणेच सरदार लोक व सर्व प्रजाजन हे सर्वस्वी तुझ्या हुकमात असतील.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan