१ इतिहास 24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहरोन वंशजांचे वर्ग हे : अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार. 2 नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकांचे काम करीत. 3 दाविदाने एलाजाराच्या वंशांतला सादोक व इथामाराच्या वंशातला अहीमलेख ह्यांना त्यांची सेवेची कामे वाटून दिली. 4 इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरुष अधिक निपजले; त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली : एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातील पितृकुळांप्रमाणे आठ होते. 5 ह्याप्रमाणे दोन्ही घराण्यांतले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली; कारण पवित्रस्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार ह्या दोन्ही वंशांतल्या पुरुषांकडे होती. 6 आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक ह्याचा पुत्र शमाया ह्याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली; एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरली. 7 पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, 8 तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची, 9 पाचवी मलकीयाची, सहावी मीयामिनाची, 10 सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची, 11 नववी येशूबाची, दहावी शकन्याची, 12 अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची, 13 तेरावी हुप्पाची, चौदावी येशेबाबाची, 14 पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची, 15 सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची, 16 एकोणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची, 17 एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलाची, 18 तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची. 19 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केली होती त्यानुसार त्यांचा पूर्वज अहरोन ह्याच्या हस्ते त्यांना लावून दिलेल्या विधीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी पाळीपाळीने जावे म्हणून हा जाण्याचा क्रम त्यांना लावून दिला होता. 20 लेवीचे वरकड वंशज : अम्रामाच्या वंशातला शूबाएल, शूबाएलाच्या पुत्रातला येहदाया. 21 रहब्याचे वंशज : रहब्याच्या वंशात मुख्य इशिया. 22 इसहारीयांतला शलोमोथ, शलोमोथाच्या पुत्रांतला यहथ; 23 हेब्रोनाचे पुत्र : पहिला यरीया, दुसरा अमर्या, तिसरा यहजियेल, चवथा यकमाम. 24 उज्जीएलाच्या वंशातला मीखा, मीखाच्या पुत्रांतला शामीर. 25 मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाच्या वंशातला जखर्या; 26 मरारीचे पुत्र : महली व मूशी; याजीयाचा वंशज बनो. 27 मरारीच्या वंशातले याजीयाचे पुत्र : बनो, शोहम, जक्कूर व इब्री. 28 महलीचा एलाजार, ह्याला पुत्र झाला नाही. 29 कीशाचे वंशज : कीशाचा वंशज यरहमेल. 30 मूशीचे पुत्र : महली, एदर व यरीमोथ; हे लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांप्रमाणे होते. 31 ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India