Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


कोश यरुशलेमेस आणतात
( २ शमु. 6:12-23 )

1 दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला.

2 दाविदाने सांगितले की, लेव्यांवाचून दुसर्‍या कोणीही देवाचा कोश उचलू नये; कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यांना परमेश्वराने निवडले आहे.”

3 परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्राएलास यरुशलेमेत एकत्र केले.

4 त्याप्रमाणेच दाविदाने अहरोनाचे वंशज व लेवी ह्यांना एकत्र केले.

5 कहाथी वंशातला प्रमुख उरीएल व त्याचे भाऊबंद एकशे वीस;

6 मरारीच्या वंशजांतला मुख्य असाया व त्याचे भाऊबंद दोनशे वीस;

7 गेर्षोमाच्या वंशजातला मुख्य योएल व त्याचे भाऊबंद एकशे तीस;

8 अलीसाफानाच्या वंशजांतला मुख्य शमाया व त्याचे भाऊबंद दोनशे;

9 हेब्रोनाच्या वंशजांतला मुख्य अलीएल व त्याचे भाऊबंद ऐंशी;

10 उज्जीएलाच्या वंशजांतला मुख्य अम्मीनादाब व त्याचे भाऊबंद एकशे बारा;

11 दाविदाने सादोक, अब्याथार याजक, उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल व अम्मीनादाब ह्या लेव्यांना बोलावून आणून सांगितले की,

12 “तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.

13 पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”

14 ह्यावरून याजक व लेवी हे इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा कोश घेऊन जाण्यासाठी शुचिर्भूत झाले.

15 मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशाला लावलेल्या काठ्या आपल्या खांद्यांवर घेऊन कोश वाहिला.

16 दाविदाने लेव्यांच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदांतले गायक नेमा.

17 तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारीवंशज ह्यांच्यातला एथान बिन कुशाया ह्यांना नेमले;

18 आणि त्यांचे भाऊबंद जखर्‍या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यइएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम व ईयेल हे जे द्वारपाळ होते त्यांना दुय्यम दर्जाचे नेमले.

19 हेमान, आसाफ व एथान ह्या गवयांना पितळेच्या झांजा वाजवून गजर करण्यासाठी नेमले;

20 आणि जखर्‍या, अजीएल, शमीरामोथ, यइएल. उन्नी, अलीयाब, मासेया व बनाया ह्यांना अलामोथ1 ह्या रागावर सारंगी वाजवण्यासाठी नेमले;

21 आणि मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, यइएल व अजज्या ह्यांना शमीनीथ1 सुरावर वीणा वाजवायला नेमले.

22 कनन्या लेव्यांचा मुख्य गायक2 होता; तो रागरागिणींची तालीम देत असे, कारण त्या कामी तो निपुण होता.

23 बरेख्या व एलकाना हे कोशाचे द्वारपाळ होते.

24 शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.

25 दावीद, इस्राएलाचे वडील जन व सहस्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले.

26 देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी लेव्यांना साहाय्य केले तेव्हा त्यांनी सात बैल व सात मेंढे ह्यांचा यज्ञ केला.

27 दावीद, कराराचा कोश वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या ह्या सर्वांनी तलम सणाचे झगे परिधान केले होते; दाविदाने तागाचे एफोद घातले होते.

28 ह्या प्रकारे सगळ्या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश जयजयकार करीत, रणशिंग, कर्णे व झांजा वाजवीत आणि सतारी व वीणा ह्यांचा नाद काढत समारंभाने वर आणला.

29 परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा नाचत व बागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan