Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


हीराम दाविदाला राजा मानतो
( २ शमु. 5:11-12 )

1 सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; आणखी त्याने गंधसरूचे लाकूड, गवंडी व सुतार दाविदासाठी मंदिर बांधायला पाठवले.

2 परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली हे दाविदाच्या लक्षात आले.


यरुशलेमेत जन्मलेली दाविदाची मुले
( २ शमु. 5:13-16 ; १ इति. 3:5-9 )

3 दाविदाने यरुशलेम येथे आणखी बायका केल्या, आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

4 यरुशलेम येथे त्याला पुत्र झाले त्यांची नावे ही : शम्मूवा, शोबाब, नाथान, शलमोन,

5 इभार, अलीशवा, एल्पलेट,

6 नोगा, नेफेग, याफीय,

7 अलीशामा, बेल्यादा व अलीफलेट.


दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो
( २ शमु. 5:17-25 )

8 दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी त्याच्या शोधास निघाले; हे ऐकून त्यांच्याशी सामना करायला दावीद निघाला.

9 पलिष्ट्यांनी येऊन रेफाईम खोर्‍यावर घाला घातला.

10 दाविदाने देवाला प्रश्‍न केला की, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर, मी त्यांना तुझ्या हाती देईन.”

11 ते बाल-परासीम येथे आले; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “देव पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर माझ्या हस्ते तुटून पडला;” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.

12 तेथे पलिष्टी आपली दैवते टाकून गेले; तेव्हा दाविदाच्या आज्ञेने ती जाळून टाकली.

13 मग पुन्हा पलिष्ट्यांनी त्या खोर्‍यावर हल्ला केला.

14 दाविदाने देवाला पुन्हा प्रश्‍न केला असता देवाने त्याला सांगितले की, “त्यांच्या वाटेस जाऊ नकोस, तर वळसा घेऊन तुतीच्या झाडासमोर त्यांच्यावर छापा घाल.

15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच युद्धासाठी पुढे चालू लाग, कारण पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी देव तुझ्या अग्रभागी गेला आहे असे समज.”

16 देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गिबोना-पासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांच्या सैन्याला मार देत गेला.

17 दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली; परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसवला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan