१ इतिहास 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)कोश यरुशलेमेस आणण्याचा दाविदाचा मानस 1 दाविदाने सहस्रपती व शतपती ह्यांपैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला. 2 दावीद इस्राएलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, “तुम्हांला ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर ह्याची तशी मर्जी असेल तर इस्राएलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जे याजक व लेवी राहत आहेत त्यांना निरोप पाठवू की, त्यांनी आपल्याला येऊन मिळावे, 3 आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्न करीत नव्हतो.” 4 मंडळीच्या सर्व लोकांना ही गोष्ट योग्य वाटली व ते म्हणाले, “आपण हे करू.” दावीद कोश आणण्यास जातो ( २ शमु. 6:1-11 ) 5 तेव्हा देवाचा कोश किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शीहोर नाल्यापासून हमाथ घाटापर्यंतचे सर्व इस्राएल दाविदाने एकत्र केले. 6 करूबारूढ असलेल्या परमेश्वर देवाच्या नामाचा कोश आणावा म्हणून दावीद व सर्व इस्राएल यहूदातले बाला उर्फ किर्याथ-यारीम येथे गेले. 7 त्यांनी देवाचा कोश, अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला; उज्जा व अह्यो गाडी हाकत होते. 8 दावीद व सर्व इस्राएल लोक देवासमोर जिवेभावे गीत गात आणि वीणा, सारंगी, डफ, झांजा व कर्णे वाजवत चालले. 9 ते कीदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केला. 10 तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने आपला हात कोशाला लावला म्हणून देवाने त्याला ताडन केले व तो त्याच्यापुढे गतप्राण झाला. 11 परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला, त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले, ते आजवर चालत आहे. 12 त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” 13 दाविदाने तो कोश आपल्या येथे दावीदपुरात नेला नाही, तर ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला. 14 देवाचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरी तीन महिने राहिला; परमेश्वराने ओबेद-अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व ह्यांना बरकत दिली. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India