Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सिकलाग येथे दाविदाला साहाय्य करणारे

1 दावीद सिकलाग येथे कीशाचा पुत्र शौल ह्याच्या भीतीने लपून राहत होता त्या वेळी जे त्याच्याकडे आले व ज्यांनी त्याला युद्धात कुमक केली ते शूर वीर हे :

2 ते धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत; हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते.

3 त्यांच्यातला प्रमुख अहीएजर व दुसरा योवाश, हे गिबावासी शमा ह्याचे पुत्र; तसेच अजमावेथ ह्याचे पुत्र यजिएल व पेलेट, बराका व अनाथोथी येहू;

4 गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,

5 एलूजय यरीमोथ, बाल्या, शमर्‍या, हरूफी शफाट्या,

6 एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर व याशबाम हे कोरहाचे वंशज;

7 आणि गदोरी यरोहामाचे पुत्र योएला व जबद्या,

8 दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :

9 एजेर मुख्य, ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा,

10 मिश्मन्ना चवथा, यिर्मया पाचवा,

11 अत्तय सहावा, एलीएल सातवा,

12 योहानान आठवा, एलजाबाद नववा,

13 यिर्मया दहावा आणि मखबन्नय अकरावा.

14 हे गादी सेनानायक होते; त्यांच्यातला कनिष्ठ शंभरांच्या तोडीचा होता व त्यांच्यातला श्रेष्ठ हजारांच्या तोडीचा होता.

15 पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा ह्यांनीच नदीपार जाऊन पूर्व व पश्‍चिम ह्या दोन दिशांकडल्या खोर्‍यांतील लोकांना पळवून लावले.

16 बन्यामिनी व यहूदी लोकांपैकीही काही लोक दाविदाकडे गढीत गेले.

17 दावीद त्यांना सामोरा जाऊन म्हणाला, “तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यासाठी माझ्याकडे आला असल्यास माझे मन तुमच्याशी जडून राहील; पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असाल तर आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हांला शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही.”

18 मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.

19 शौलाबरोबर युद्ध करण्यासाठी दावीद पलिष्ट्यांसह आला तेव्हा मनश्शेच्या लोकांपैकी काही लोक दाविदाला सोडून गेले होते. (तरी दाविदाने पलिष्ट्यांना साहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसांत सल्लामसलत करून त्याला घालवून दिले; ते म्हणाले, “तो आमची शिरे जोखमीत घालून आपला स्वामी शौल ह्याला पुन्हा जाऊन मिळायचा.”)

20 तो सिक्लाग येथे गेला तेव्हा मनश्शेतले अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, सिलथय हे मनश्शेचे सहस्रपती फितून त्याच्याकडे गेले.

21 त्यांनी लुटारूंच्या टोळीपासून दाविदाचे रक्षण केले; ते सर्व शूर वीर असून सेनानायक होते.

22 दररोज लोक दाविदाची कुमक करण्यासाठी त्याला येऊन मिळत; शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली.


हेब्रोन येथील दाविदाचे सैन्य

23 परमेश्वराच्या वचनानुसार शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून जे लोक युद्ध करण्यासाठी हत्यारबंद होऊन हेब्रोन येथे त्याच्याकडे आले त्यांच्या प्रमुखांची गणती ही :

24 यहूदी लोकांतले ढालबरची धारण करणारे, लढण्या-साठी हत्यारबंद झालेले लोक सहा हजार आठशे,

25 शिमोनी वंशातले लढाईस सिद्ध झालेले शूर वीर सात हजार शंभर;

26 लेव्यांतले चार हजार सहाशे इतके होते.

27 अहरोन घराण्याचा नायक यहोयादा होता, त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.

28 सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला; त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले बावीस सेनानायक आले.

29 शौलाचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्यापैकी तीन हजार आले; कारण हा वेळपावेतो बहुतेक बन्यामिनी लोक शौलाच्या घराण्यास धरून होते.

30 एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले.

31 मनश्शेच्या अर्ध्या वंशातले अठरा हजार लोक दाविदाला राजा करण्यास आले; त्यांची नावे नोंदण्यात आली.

32 कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.

33 युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले पन्नास हजार योद्धे आले; त्यांना व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे.

34 नफताली वंशातले सेनानायक एक हजार व त्यांच्याबरोबर ढाल व भाला धारण करणारे सदतीस हजार आले.

35 सैन्याची व्यूहरचना करणारे दान वंशातले अठ्ठावीस हजार सहाशे योद्धे आले.

36 सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईस जाणारे आशेर वंशातले चाळीस हजार योद्धे आले.

37 यार्देनेच्या पूर्वेस राहणारे रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यातले एक लक्ष वीस हजार लोक युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन आले.

38 हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदाला सर्व इस्राएलाचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खर्‍या मनाने आले; दाविदाला राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले.

39 ते तेथे तीन दिवस दाविदाबरोबर खातपीत राहिले, कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी सर्व सामग्री तयार केली होती.

40 ह्याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली ह्या प्रांतांपर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल आदिकरून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल ह्यांवर लादून आणल्या; त्याप्रमाणेच त्यांनी बैल व शेरडेमेंढरे पुष्कळ आणली, कारण इस्राएलात उत्सव चालला होता.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan