रोमकरांस 6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)ख्रिस्ताशी एकरूपता व पाप यांतील विरोध 1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? 2 मुळीच नाही! जे आपण पापाला मेलो ते ह्यापुढे त्यात कसे राहणार? 3 किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? 4 तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही उठून नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. 5 कारण आपण जर त्याच्या अशा मरणात त्याच्याशी जोडले गेलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानानेही निश्चितपणे त्याच्याशी जोडले जाऊ. 6 हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाची गुलामी पत्करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला; 7 कारण जो कोणी मरण पावतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरतो. 8 परंतु ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यामुळे त्याच्याबरोबर आपण जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे. 9 आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही 10 आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो. 11 तर मग तसे तुम्हीही स्वतःस ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. 12 म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये. 13 तुम्ही यापुढे तुमचे अवयव दुष्टपणाची साधने म्हणून वापरू नका, परंतु तुमचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून देवाला अर्पण करा कारण तुम्हाला मरणातून जीवनाकडे आणण्यात आले आहे. 14 तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये. गुलामगिरीविषयी केलेला बोध 15 तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! 16 ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात,हे तुम्हांला ठाऊक नाही काय? ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात? 17 तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले 18 आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद! 19 तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जसे तुम्ही आपले अवयव अमंगळपण व स्वैराचार करण्याकरिता वापरले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला गुलाम म्हणून समर्पित करा. 20 तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वासंबंधाने बंधमुक्त होता. 21 तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त झाले? त्यांचा शेवट तर मरण आहे! 22 परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते. 23 पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India