रोमकरांस 5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)विश्वासाचे फळ 1 आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती मिळालेली आहे. 2 आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्या कृपेत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या वैभवात सहभागी होण्याची आशा बाळगतो. 3 इतकेच नव्हे, तर संकटाचाही आपण अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, 4 धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. 5 ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे प्रकट झालेली देवाची प्रीती 6 आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला. 7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. 8 परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाही ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. 9 तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण किती अधिक प्रमाणात त्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत!. 10 आपण शत्रू असता देवाबरोवर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता, त्याच्या जीवनाने आपण किती अधिक प्रमाणात तारले जाणार आहोत!. 11 इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवामध्ये अभिमान बाळगतो. आदामकडून मृत्यू, ख्रिस्ताकडून जीवन 12 एका माणसाद्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. 13 नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होते, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. 14 तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उ्रंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही मरणाने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. 15 परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता फारच अधिक प्रमाणात विपुल झाली 16 आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. परंतु कृपादानामुळे सर्व निर्दोषी ठरवले जातात. 17 जर त्या एकाच माणसाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेच्या व नीतिमत्त्वाच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते कितीतरी अधिक प्रमाणात येशू ख्रिस्त या एका माणसाद्वारे जीवनात राज्य करतील. 18 तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे एका माणसाच्या नीतिमत्त्वाच्या कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. 19 जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे एका माणसाच्या आज्ञापालनाद्वारे पुष्कळ जण नीतिमान ठरविले जातील. 20 नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली. 21 तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India