Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

रोमकरांस 4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


अब्राहामचे उदाहरण

1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने ऐहिक दृष्टीने काय कमावले असे म्हणावे?

2 अब्राहाम कृत्यांनी नीतिमान ठरला असला, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. परंतु देवासमोर नाही.

3 धर्मशास्त्र काय सांगते? ‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान असे गणण्यात आले’.

4 आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते.

5 अधार्मिकाला नीतिमान ठरवणाऱ्या देवावर जो विश्वास ठेवतो पण सकृत्ये करीत नाही, त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान गणण्यात येते.

6 ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो,

7 ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य!

8 ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!

9 तर मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरिता घोषित करण्यात आलेला आहे किंवा सुंता न झालेल्यांकरिताही आहे? आम्ही असे म्हणतो, “विश्वास हा अब्राहामसाठी नीतिमत्व असा गणण्यात आला होता”.

10 हे कधी झाले? त्याची सुंता झालेली असताना किंवा नसताना? सुंता झालेली असताना नव्हे, तर सुंता न झालेली असताना.

11 त्याला त्याच्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण त्याला मिळाली. म्हणून, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने पूर्वज व्हावे.

12 आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही पूर्वज व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पूर्वज अब्राहाम त्याची सुंता होण्यापूर्वी त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून ते चालतात म्हणून त्यांचाही त्याने बाप व्हावे.

13 तो जगाचा वारस होईल, हे अभिवचन अब्राहामला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासामुळे प्राप्त झाले.

14 नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास फोल ठरला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे.

15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही, तेथे उ्रंघन नाही.

16 ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे.

17 ‘मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे’, असे अब्राहामविषयी धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे, त्याप्रमाणे तो देवासमक्ष आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याने जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करून अस्तित्वात आणतो, अशा देवावर विश्वास ठेवला.

18 ‘आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती होईल’, ह्या धर्मशास्त्रवचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही विश्वास ठेवला.

19 आपल्या शरीराची वयोवृद्ध अवस्था (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाची अक्षमता ह्या गोष्टी लक्षात घेऊनही तो विश्वासात दुर्बल झाला नाही.

20 परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने दृढ होऊन त्याने देवाचा गौरव केला.

21 देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती.

22 म्हणूनच ‘ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.’

23 ‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे,

24 तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीदेखील ते लिहिलेले आहे, त्या आपणासाठीसुद्धा ते नीतिमत्व म्हणून गणले जाणार आहे.

25 तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan