Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

रोमकरांस 11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


इस्राएली लोकांचा शेष भाग

1 तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? मुळीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे.

2 ज्यांची त्याने सुरुवातीपासून निवड केली, त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत धर्मशास्त्र काय म्हणते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली:

3 ‘हे प्रभो, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या. मी एकटाच राहिलो आहे, ते माझा प्राण घ्यायचा प्रयत्न करीत आहेत.’

4 परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ‘ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.’

5 तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे

6 आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही.

7 तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले.

8 धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे: देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले. आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत.

9 दावीददेखील म्हणतो: त्यांचे सण त्यांना फास व सापळा, अडखळण व शिक्षा असे होवोत.

10 त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत आणि तू त्यांना नेहमी वाकव.

11 तर मी विचारतो, यहुदी लोकांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? मुळीच नाही! तर त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधामुळे यहुदीतरांचे तारण झाले आहे.

12 आता त्यांचा अपराध हा जर जगासाठी आशीर्वाद आणि त्यांचा ऱ्हास हा जर यहुदीतरांसाठी आशीर्वाद ठरला आहे, तर त्या सर्वांचा समावेश झाल्यास तो आशीर्वाद किती तरी अधिक महान होईल!


यहुदीतरांचे तारण: कलम करण्याचे उदाहरण

13 यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो.

14 ह्यात माझा उद्देश असा आहे की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करावी व त्यांच्यांतील काहींना तारावे.

15 त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार आहे!

16 पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र.

17 अस्सल अशा ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू जंगली ऑलिव्ह झाडाच्या फांदीसारखा असता त्यांच्या जागी कलमरूपे जर लावला गेलास व अस्सल अशा कसदार ऑलिव्ह वृक्षाच्या मुळाचा भागीदार झालास,

18 तर ‘त्या फांद्यांहून मी मोठा आहे,’ अशी बढाई मारू नकोस. मारशील, तर हे लक्षात ठेव की, तू केवळ एक फांदी आहेस, तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.

19 परंतु तू म्हणशील, ‘माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.’

20 ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा.

21 जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुझा बचाव करील काय?

22 देवाची ममता व कठोरता पाहा, पतन झालेल्यांविषयी कठोरपणा आणि तुझ्यासाठी त्याची ममता. मात्र तू त्याच्या ममतेत राहशील तर, अन्यथा तूही छाटून टाकला जाशील.

23 तसेच ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम करण्यास देव समर्थ आहे.

24 जे मूळचे जंगली ऑलिव्ह झाड त्यांतून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून अस्सल ऑलिव्ह वृक्षात करण्यात आले. तर ह्या ज्या मूळच्या त्याच्याच फांद्या आहेत, त्यांचे कलम त्या अस्सल ऑलिव्ह वृक्षात किती सहजतेने करण्यात येईल?


सर्वांवर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू

25 बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, यहुदीतरांचा भरणा पूर्ण होईपर्यंत इस्राएली लोक तात्पुरते दुराग्रहाने श्रद्धेपासून दुरावले आहेत.

26 परंतु पुढे सर्व इस्त्राएली लोकांचे तारण होईल, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे: मुक्तिदाता सियोनमधून येईल, तो याकोबच्या वंशजांमधून सर्व दुष्टपणा दूर करील.

27 मी त्यांची पापे दूर करतो, तेव्हा त्यांच्याबरोबरचा माझा हा करार आहे.

28 शुभवर्तमानाचा स्वीकार न केल्यामुळे तुमच्यासाठी ते शत्रू आहेत. परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे ते देवाचे प्रियजन आहेत.

29 देवाला पस्तावा होत नाही आणि तो कृपादान व पाचारण काढून परत घेत नाही.

30 पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे.

31 त्याप्रमाणे तुमच्यावरील दयेमुळे त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे.

32 त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कैदेत ठेवले आहे.

33 अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!

34 धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? त्याचा स्रागार कोण झाला आहे?

35 त्याला प्रथम देऊन त्याच्याकडून फेड करून घेईल असा कोण आहे?

36 कारण सर्व काही त्याच्याकडून, त्याच्याचद्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ निर्माण करण्यात आले आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan