Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 नंतर पाचव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली देण्यात आली होती.

2 त्या ताऱ्याने अथांग विवर उघडला, तेव्हा त्यातून अवाढव्य भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या विवरातल्या धुराने सूर्य व अंतराळही अंधकारमय झाले.

3 त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली होती.

4 त्यांना असे सांगण्यात आले होते की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.

5 त्यांना ठार मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते. ती पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती.

6 त्या दिवसांत माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मरण येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

7 त्या टोळांचे रूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काही तरी दिसत होते. त्यांचे चेहरे माणसांसारखे होते.

8 त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहांच्या दातांसारखे होते.

9 त्यांची उरस्त्राणे लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती. त्यांच्या पंखांचा आवाज युद्धातील अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.

10 त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपट्यांत होती.

11 अथांग विवराचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. हिब्रू भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि ग्रीक भाषेतले त्याचे नाव अप्रूओन आहे.

12 पहिला अनर्थ होऊन गेला आहे. पाहा, ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत.

13 नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांतून झालेली एक वाणी मी ऐकली.

14 कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.

15 तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे ठार मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.

16 घोडदळाची संख्या वीस कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली.

17 त्या दृष्टान्तात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक हे सारे निघत होते.

18 त्यांच्या तोंडांतून निघणारे अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे ठार मारली गेली.

19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते उपद्रव करतात.

20 त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही

21 आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, लैंगिक अनैतिकता व चोऱ्या यांच्याबद्दलही पश्चाताप केला नाही.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan