प्रकटी 17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)वेश्या व श्वापद 1 त्यानंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन मला म्हणाला, “इकडे ये, कुप्रसिद्ध वेश्येचा म्हणजेच अनेक नद्यांजवळ वसलेल्या महान नगरीचा न्यायनिवाडा होणार आहे, तो मी तुला दाखवितो.” 2 तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. 3 मग मी आत्म्याने प्रभावित झालो असताना, त्याने मला रानात नेले, तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. 4 ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती. आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता. 5 तिच्या कपाळावर “महान बाबेल, वेश्यांची व पृथ्वीवरील विकृतीची आई”, हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. 6 ती स्त्री पवित्र लोकांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. 7 देवदूताने मला विचारले, “तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद ह्यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो. 8 जे श्वापद तू पाहिले, ते अस्तित्वात होते परंतु आता नाही. ते अथांग विवरातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, ते श्वापद पूर्वी होते, आता नाही तरीही पुन्हा अवतरले, असे पाहून आश्चर्य वाटेल. 9 येथे सुज्ञता व समज यांची गरज आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत. त्यांवर ती स्त्री बसते. ती डोकी म्हणजे सात राजेदेखील आहेत, 10 त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक जिवंत आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर थोडाच वेळराहील. 11 जे श्वापद पूर्वी होते आणि आता नाही, तेच आठवे आहे. परंतु ते ह्या सातांचे आहे आणि त्याचा नाश होणार आहे. 12 जी दहा शिंगे तू पाहिलीस ती म्हणजे दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही. परंतु त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजाचा अधिकार दिला जाईल. 13 त्यांचे सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देण्यात त्यांच्यात ऐक्य आहे. 14 ते कोकराबरोबर लढतील, परंतु कोकरू त्यांना जिंकील, कारण कोकरू प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे आहेत ते कोकराच्या बरोबर आहेत.” 15 तो देवदूत मला आणखी म्हणाला, “जेथे वेश्या बसली आहे, तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस ते लोक, समुदाय, राष्ट्रे व भाषा बोलणारे असे आहेत. 16 जी दहा शिंगे तू पाहिलीस ती व श्वापद वेश्येचा द्वेष करतील व तिला एकाकी व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. 17 त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. 18 जी स्त्री तू पाहिलीस ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय.” |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India