Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


कोकरू व त्याची प्रजा

1 नंतर कोकरू सीयोन डोंगरावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. त्याचे व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक त्याच्याबरोबर होते.

2 अनेक जलप्रवाहांच्या निनादासारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. जी वाणी मी ऐकली, ती जणू काही वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती.

3 ते एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक राजासन, चार प्राणी व वडीलजन ह्यांच्यासमोर एक नवे गीत गात होते. ते गीत ह्यांच्याशिवाय कोणीही शिकू शकले नाहीत. पृथ्वीवरील सर्व लोकांपैकी ह्यांचेच तारण झाले आहे.

4 स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.

5 त्यांच्या तोंडांत असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत.


तीन देवदूतांचे संदेश

6 नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळात उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे सर्व राष्ट्रे, वंश, भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगावयास शाश्वत शुभवर्तमान होते.

7 तो उच्च स्वरात म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याची आराधना करा.”

8 त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “तिचे पतन झाले! महान बाबेलचे पतन झाले! तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना प्यायला लावला.”

9 त्याच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,

10 तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात भरपूर प्रमाणात ओतलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि हे करणाऱ्यांना पवित्र देवदूतांसमक्ष व कोकरांसमक्ष अग्नी व गंधक ह्यापासून पीडा होईल.

11 त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुगे वर येतो आणि जे श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतात, आणि जे कोणी त्याच्या नावाची खूण धारण करतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.

12 म्हणूनच देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा केली जाते.”

13 तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल कारण त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात.”


हंगाम व कापणीची वेळ

14 नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता.

15 त्यानंतर आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसला होता, त्याला उच्च स्वरात म्हणाला, “तू आपला विळा चालवून कापणी कर कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक तयार आहे.”

16 त्यानंतर मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.

17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.

18 ज्याला अग्नीवर अधिकार आहे, असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला. त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, “तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून घे. तिची द्राक्षे पिकली आहेत!”

19 तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.

20 ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहू लागले, त्याचा प्रवाह सुमारे दोन मीटर खोल असून तो सुमारे तीनशे किलोमिटर वाहत गेला.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan