Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

फिलिप्पैकरांस 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


ख्रिस्तप्राप्तीपुढे सर्व हक्क कवडीमोल

1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अगोदर लिहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मी कंटाळा करीत नाही, परंतु हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.

2 ह्या कुत्र्यांपासून सावध रहा, दुष्कर्म्यांपासून सावध रहा, केवळ शरीराला बाधा पोहचवणाऱ्यांपासून सावध रहा.

3 आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.

4 अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार.

5 मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे.

6 आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.


ख्रिस्तप्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा

7 परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो.

8 इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा,

9 मी त्याच्यामध्ये आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे विश्वासावर आधारित व देवाकडून मिळणारे असे नीतिमत्त्व असावे.

10 माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे.

11 म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे.

12 एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे.

13 बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून,

14 स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्‍त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.

15 जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील.

16 तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या.


पौलाचे अनुकरण

17 बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.

18 मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत.

19 पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.


ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे

20 आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.

21 ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे दैन्यावस्थेतील शरीर त्याच्या स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan