Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

फिलेमोन 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


विषयप्रवेश

1 आमचा प्रिय सहकारी फिलेमोन, तुझ्या घरात जमणारी ख्रिस्तमंडळी, आमची भगिनी अफ्फिया व आमचा सहसैनिक अर्खिप्प, तुम्हां सर्वांना

2 ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:

3 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.


पळून गेलेल्या गुलामाच्या वतीने विनंती

4-5 सर्व पवित्र लोकांवर असलेली तुझी प्रीती व प्रभू येशूवरील तुझा विश्वास ह्यांच्याविषयी ऐकून मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे आभार मानतो.

6 मी प्रार्थना करतो की, श्रद्धेमधील तुझी सहभागिता परिणामकारक व्हावी व त्यामुळे जे चागले आपण ख्रिस्तासाठी करावे ते तुम्ही समजून घ्यावे.

7 तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व मला प्रोत्साहन मिळाले कारण हे बंधो, तू पवित्र लोकांची अंतःकरणे उल्लसित केली आहेत.

8 ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते.

9 परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे.

10 मी तुरुंगात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला तो माझा पुत्र अनेसिम ह्याच्याविषयी विनंती करतो.

11 तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, परंतु आता तुला व मलाही उपयोगी आहे.

12 मला प्राणप्रिय असलेल्या त्याला, मी तुझ्याकडे परत पाठविले आहे.

13 शुभवर्तमानामुळे मी तुरुंगात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.

14 पण तू मला साहाय्य करावे, हे मला तुझ्यावर लादायचे नाही, तर तू हे स्वेच्छेने करावे, अशी माझी इच्छा आहे.

15 कदाचित तो तुझ्यापासून थोडा वेळ वेगळा झाला, ते अशाकरिता असेल की, त्याने सदासर्वकाळ तुझे व्हावे.

16 त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो किती तरी प्रिय आहे आणि तुला एक दास म्हणून व प्रभूमध्ये एक बंधू म्हणून किती तरी अधिक प्रिय होईल.

17 म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर.

18 त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड.

19 हे मी, पौलाने स्वतः लिहिले आहे. मी तुझी परतफेड करीन. माझे तुझ्यावर किती उपकार आहेत, ह्याविषयी मी काही बोलत नाही.

20 हे बंधो, प्रभूसाठी माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्तामध्ये माझा बंधू म्हणून मला आनंदित कर!

21 तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की, मी जे सांगतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.


समारोप

22 तसेच माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव; कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे माझे तुमच्याकडे परत येणे होईल, अशी मला आशा आहे.

23 ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास

24 आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला शुभेच्छा कळवतात.

25 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan