Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मार्क 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


साबाथ दिवशी आरोग्यदान

1 येशू पुन्हा एकदा सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता.

2 येशूवर दोष ठेवावा म्हणून साबाथ दिवशी तो त्याला बरे करतो का, हे पाहायला काही लोक टपून बसले होते.

3 त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, समोर उभा राहा.”

4 नंतर त्याने लोकांना विचारले, “साबाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते धर्मशास्त्रानुसार आहे?” पण ते गप्प राहिले.

5 त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे खिन्न होऊन त्याने त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा झाला.

6 मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले.


अनेकांना आरोग्यदान

7 त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला

8 आणि यरुशलेम, इदोम व यार्देनच्या पलीकडचा विभाग, तसेच सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा परिसर, ह्यांतून मोठा लोकसमुदाय येशूच्या महान कार्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.

9 गर्दीमुळे स्वतः चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवायला सांगितले.

10 त्याने अनेकांना बरे केले होते आणि जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करायला एकमेकांना ढकलत त्याच्याकडे जात होते.

11 जेव्हा भुते त्याला पाहत तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, “तू देवाचा पुत्र आहेस.”

12 मात्र तो भुतांना ताकीद देऊन सांगत असे, “मला प्रकट करू नका.”


बारा प्रेषितांची निवड

13 येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले.

14-16 आपल्याबरोबर राहण्यासाठी व संदेश द्यायला पाठवण्यासाठी, तसेच रोग बरे करायचा व भुते काढायचा अधिकार देण्यासाठी, त्याने बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित म्हणूनही संबोधिले. त्याने पुढील बारा जणांची नेमणूक केली:शिमोन (येशूने त्याला पेत्र हे नाव दिले);

17 जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले);

18 अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी

19 व येशूचा विश्वासघात करणारा यहुदा इस्कर्योत.


येशू आणि बालजबूल

20 नंतर येशू घरी आला, तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, येशूला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड होईना.

21 हे ऐकून त्याचे आप्त त्याला घेऊन जायला आले कारण त्याला वेड लागले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते.

22 तसेच यरुशलेमहून आलेले काही शास्त्री म्हणत होते की, त्याला बालजबूलने पछाडले आहे व त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने तो भुते काढतो.

23 तो त्यांना स्वतःजवळ बोलावून दाखले देऊन म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील?

24 आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही.

25 आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही.

26 तसेच सैतानाच्या राज्यात फूट पडली तर तेही टिकणार नाही; त्याचा शेवट होईल.

27 बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही, त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.

28 मी तुम्हांला खरोखर सांगतो, लोकांना त्यांच्या सर्व पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल.

29 परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.”

30 त्याला भुताने पछाडले आहे, असे काही लोक म्हणत होते म्हणून त्याने हे उत्तर दिले.


येशूची आई व भाऊ

31 येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले.

32 त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “आपली आई व आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारपूस करत आहेत.”

33 त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”

34 जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!

35 जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan