मार्क 15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)पिलातसमोर येशू 1 पहाट होताच वडीलजन व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलातच्या स्वाधीन केले. 2 पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.” 3 मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप करीत होते. 4 पिलातने त्याला पुन्हा विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? पाहा, ते तुझ्यावर किती तरी आरोप करीत आहेत.” 5 तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्चर्य वाटले. 6 सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत, त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. 7 बंडात भाग घेणाऱ्यांतील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर अटक केलेला बरब्बा नावाचा एक माणूस होता. 8 लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” 9 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?” 10 मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता. 11 परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला सोडा, ही मागणी करायला मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. 12 पिलातने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहुदी लोकांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?” 13 “त्याला क्रुसावर खिळा”, अशी त्यांनी ओरड केली. 14 पिलातने त्यांना म्हटले, “का? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” 15 लोकसमुदायाला खुश करावे, ह्या हेतूने पिलातने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. येशूचा उपहास 16 शिपायांनी त्याला राज्यपालांच्या वाड्यात नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. 17 त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा चढवला आणि काटेरी डहाळ्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर घातला. 18 ते मुजरा करून त्याला म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” 19 त्यांनी त्याच्या मस्तकावर काठीने मारले, ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. 20 अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले. येशूला क्रुसावर खिळले 21 गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता. 22 त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. 23 त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. 24 त्यानंतर त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणते कपडे कोणी घ्यावे ह्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. 25 त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. 26 ‘यहुदी लोकांचा राजा’, अशी त्याच्यावरील दोषारोपाची पाटी क्रुसावर लावली होती. 27 त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले. 28 [‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.] 29 जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, 30 स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली ये!” 31 तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही! 32 इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता क्रुसावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आमचा विश्वास बसेल.” येशूबरोबर क्रुसावर खिळलेलेसुद्धा त्याची निंदा करत होते. येशूचा मृत्यू 33 मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला. 34 दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 35 हे ऐकून जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जण म्हणू लागले, “पाहा, तो एलियाला हाक मारत आहे.” 36 त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन आंबेत भिजवलेला स्पंज एका काठीच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला आणि म्हटले, “थांबा! एलिया त्याला क्रुसावरून खाली उतरून घ्यायला येतो की काय हे पाहू!” 37 येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. 38 त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. 39 येशूने अशा प्रकारे प्राण सोडला, हे पाहून क्रुसासमोर उभ्या असलेल्या सैन्याधिकाऱ्याने म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.” 40 काही महिलादेखील दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या. 41 तो गालीलमध्ये असताना ह्या त्याच्याबरोबर फिरून त्याची सेवा करत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमहून आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रियादेखील होत्या. येशूची उत्तरक्रिया 42 ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे साबाथपूर्व दिवस होता. 43 म्हणून अरिमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तो स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 44 येशू इतक्यात कसा निधन पावला, ह्याचे पिलातला आश्चर्य वाटले. त्याने सैन्याधिकाऱ्याला बोलावून घेऊन विचारले, “येशूला प्राण सोडून बराच वेळ झाला की काय?” 45 सैन्याधिकाऱ्याचा अहवाल ऐकल्यावर त्याने येशूचे शरीर योसेफच्या स्वाधीन करण्यास संमती दिली. 46 योसेफने तागाचे कापड आणले व शरीर खाली काढून ते तागाचे कापड त्याच्याभोवती गुंडाळले. त्यानंतर त्याने ते खडकात खोदलेल्या कबरीत ठेवले व कबरीच्या तोंडाशी शिळा सरकवून लावली. 47 येशूला कोठे ठेवले, हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India