Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मत्तय 27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


पिलातसमोर येशू

1 भल्या पहाटे सर्व मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी येशूला ठार मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले.

2 त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले.


यहुदाचा मृत्यू

3 येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला,

4 “मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.”

5 त्याने ती नाणी मंदिरात टाकली. तो निघून गेला व त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.

6 परंतु मुख्य याजकांनी ती नाणी गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे धर्मशास्त्राला धरून नाही; कारण हे रक्‍ताचे मोल आहे.”

7 त्यांनी आपसात विचारविनिमय करून त्या नाण्यांतून परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.

8 त्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात.

9 जे वचन यिर्मया संदेष्ट्याद्वारे सांगितले होते, ते त्या वेळी पूर्ण झाले. ते असे: ज्याचे मोल इस्राएलच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले होते, त्याचे मोल म्हणजे ती तीस चांदीची नाणी त्यांनी घेतली

10 आणि परमेश्वराने मला निर्देश दिल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी ती वापरली.


येशूची चौकशी

11 येशूला रोमन राज्यपालांच्या पुढे उभे केले असता राज्यपालांनी त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.”

12 परंतु मुख्य याजक व वडीलजन हे त्याच्यावर दोषारोप करत असता तो काहीच बोलला नाही.

13 तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे किती गोष्टींची तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, हे तुला ऐकू येत नाही काय?”

14 परंतु त्याने एकाही आरोपाबद्दल काही उत्तर दिले नाही, ह्याचे राज्यपालांना फार आश्चर्य वाटले.


क्रुसावरील मृत्यूची शिक्षा

15 ओलांडण सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची राज्यपालांची प्रथा होती.

16 त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता.

17 लोक जमल्यावर पिलातने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की, ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?”

18 यहुदी अधिकाऱ्यांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे त्याला ठाऊक होते.

19 तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला, “त्या निर्दोष मनुष्याच्या बाबतीत आपण मध्ये पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.’

20 इकडे मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूला मरणदंड मिळावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.

21 परंतु राज्यपालांनी त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.”

22 पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”

23 नंतर त्याने विचारले, “का बरे? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरडा करत म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”

24 आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गदारोळ होत आहे, असे पाहून पिलातने पाणी घेतले व लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या मनुष्याच्या रक्‍ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”

25 सर्व लोकांनी उत्तर दिले, “त्याचे रक्‍त आम्हांवर व आमच्या मुलाबाळांवर असो.”

26 तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.


येशूला क्रुसावर खिळले

27 नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली.

28 त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याला जांभळा झगा घातला

29 आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून ते उपहासाने म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!”

30 ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले.

31 अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून तो झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला घेऊन गेले.

32 ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले.

33 ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले.

34 तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही.

35 त्याला क्रुसावर खिळल्यानंतर त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.

36 नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले.

37 त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे.

38 त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे.

39 जवळून जाणारे येणारे डोकी हालवत येशूची निंदा करत होते,

40 “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास, तर स्वतःचा बचाव कर आणि क्रुसावरून खाली उतर.”

41 तसेच मुख्य याजकदेखील शास्त्री व वडीलजन ह्यांच्याबरोबर त्याचा उपहास करत म्हणाले,

42 “त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्राएलचा राजा आहे. त्याने आता क्रुसावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवू.

43 तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.”

44 जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली.


येशूचा मृत्यू

45 दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला

46 आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”

47 तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलियाला हाक मारतो.”

48 त्यांच्यातून एकाने त्वरित धावत जाऊन स्पंज घेतला, तो आंबेत भिजवला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला.

49 इतर म्हणाले, “थांब, एलिया त्याचा बचाव करायला येतो का, हे आपण पाहू.”

50 नंतर येशूने पुन्हा मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला!

51 त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली. खडक फुटले.

52 थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले.

53 ते थडग्यांतून निघून येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र शहरात गेले आणि अनेकांच्या दृष्टीस पडले.

54 रोमन अधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.”

55 तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या.

56 त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसे ह्यांची आई मरिया व जब्दीची पत्नी ह्यांचा समावेश होता.


येशूची उत्तरक्रिया

57 संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता.

58 त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला.

59 म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले.

60 ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.

61 तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या.

62 दुसऱ्या दिवशी म्हणजेच साबाथच्या दिवशी, मुख्य याजक व परुशी पिलातसमोर जमून म्हणाले,

63 “महाराज, तो लबाड जिवंत होता तेव्हा म्हणाला होता, “तीन दिवसांनंतर मी उठेन’, ह्याची आम्हांला आठवण आहे.

64 म्हणून आपण तिसऱ्या दिवसापर्यंत कबरीचा बंदोबस्त करायला सांगा, नाही तर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे, असे लोकांना सांगतील. मग शेवटची फसगत पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”

65 पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारेकऱ्यांची तुकडी आहे. जा. तुम्ही शक्य तेवढा बंदोबस्त करा.”

66 तेव्हा तुकडी बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी शिळा शिक्काबंद करून कबरीवर पहारा ठेवला.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan